... आणि ‘झोये’ पुन्हा पाहू लागला !
By Admin | Published: April 16, 2017 03:26 AM2017-04-16T03:26:28+5:302017-04-16T03:26:28+5:30
‘झोये’ या श्वानावर परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर, आता तिसऱ्या आठवड्यानंतर ‘झोये’च्या
- स्नेहा मोरे, मुंबई
‘झोये’ या श्वानावर परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर, आता तिसऱ्या आठवड्यानंतर ‘झोये’च्या डोळ््याची दृष्टी पुन्हा आली असून, त्याला दिसू लागले आहे. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि ‘झोये’च्या मित्रपरिवारांत आनंदाचे वातावरण आहे.
‘झोये’या पाचवर्षीय लॅब्राडोर जातीच्या श्वानाच्या उजव्या डोळ््यावर २५ मार्च रोजी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पार पडली. गेल्या वर्षी परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या बाहेरील आवारात ‘झोये’ जखमी अवस्थेत आढळला होता. त्या वेळेस त्याला दिसत नसल्याने, सतत भिंती आणि खांबांना आदळायचा. ‘झोये’ला आम्हाला दत्तक घ्यायचे होते, परंतु त्याच्या दृष्टीच्या समस्येने अडथळे येत होते, असे अॅनिमल अॅडॉप्शन क्रुसेडर्स संस्थेशी संलग्न असलेल्या प्राणिमित्र असलेल्या कीर्ती भारद्वाज यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यानंतर, पशुवैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टरांशी ‘झोये’च्या स्थितीविषयी चर्चा केली, त्या वेळेस त्यांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला.
श्वानावर झालेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेविषयी माजी लष्कर पशुवैद्यक व बलघोडा रुग्णालयाचे सचिव कर्नल डॉ. जे. सी. खन्ना यांनी सांगितले की, ‘श्वानावर करण्यात आलेल्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचे स्वरूप मानवी डोळ््यावर करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेप्रमाणे होते. या शस्त्रक्रियेनंतर श्वानाची पूर्ण दृष्टी येणार नाही.
यापूर्वीही पशुवैद्यकीय रुग्णालयात भटक्या श्वानावर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेत नेत्रतज्ज्ञ डॉ. स्वरांजित भट्टी यांचाही सहभाग होता.’ ते म्हणाले की, ‘शस्त्रक्रियेनंतर काही दिवस ‘झोये’ला एलिझाबेथ कॉलर लावून निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर ‘झोये’ची प्रकृती सुधारत असून, अंतिमत: ४० टक्के दृष्टी निश्चितच परत येईल.’
- श्वानावर झालेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेविषयी माजी लष्कर पशुवैद्यक व बलघोडा रुग्णालयाचे सचिव कर्नल डॉ. जे. सी. खन्ना यांनी सांगितले की, ‘श्वानावर करण्यात आलेल्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचे स्वरूप मानवी डोळ््यावर करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेप्रमाणे होते. या शस्त्रक्रियेनंतर श्वानाची पूर्ण दृष्टी येणार नाही. मात्र, पूर्वीपेक्षा श्वानाचे आयुष्य निश्चितच सुरळीत होईल.