डायघरमध्ये आॅनर किलिंग
By admin | Published: September 20, 2016 04:44 AM2016-09-20T04:44:47+5:302016-09-20T04:44:47+5:30
दोघेही वेगवेगळ्या धर्माचे. एकमेकांवर प्रेम जडल्याने दोघांनीही उत्तर प्रदेशमधून पळून येऊन डायघर गाठले.
ठाणे : दोघेही वेगवेगळ्या धर्माचे. एकमेकांवर प्रेम जडल्याने दोघांनीही उत्तर प्रदेशमधून पळून येऊन डायघर गाठले. गेल्या वर्षभरापासून त्यांचा सुखी संसार सुरू होता. अचानक तिच्या माहेरहून मानलेला भाऊ घरी आला. तो त्याचाही मित्र असल्यामुळे त्याने त्यांच्याकडे मुक्कामही केला. त्याच रात्री त्याने दोघांवरही ‘सैराट’ कथानकाप्रमाणे चाकूने वार करून त्यांची हत्या केली. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने मोठ्या कौशल्याने या प्रकरणाचा छडा लावून शफीक मन्सुरी (२८) याला थेट उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतल्याची माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली.
डायघर गावातील सागर इमारतीमधील पहिल्या मजल्यावर गेल्या दोन महिन्यांपासून राहणारे विजयशंकर यादव (३५) आणि त्याची पत्नी प्रिया (२२, लग्नापूर्वीचे नाव सुफिया अबरार मन्सुरी) यांचा चाकूने खून केल्याची घटना १२ सप्टेंबर रोजी घडली होती. परिसरात दुर्गंधी पसरल्याने १५ सप्टेंबर रोजी हा प्रकार उघडकीस आला. त्याच दिवशी शीळ-डायघर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या आदेशाने गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकानेही या प्रकरणाचा तपास सुरू केला. यादव यांच्या घरी १२ सप्टेंबर रोजी सुफियाचा गावाकडील नातेवाईक आला होता. त्याच दिवसानंतर त्यांचे घर बंद होते, अशी माहिती या पथकाला मिळाली. घटनास्थळी मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे मारेकरी हा प्रिया ऊर्फ सुफियाच्या गावाकडील असल्याचे उघडकीस आणले. अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त पराग मणेरे, सहायक आयुक्त मुकुंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे यांच्यासह निरीक्षक रणवीर बयेस, सहायक निरीक्षक श्रीशेल चिवडशेट्टी, समीर अहिरराव, संदीप बागुल, हवालदार आनंदा भिलारे आदींनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने हरदोई जिल्ह्यातील पलिया गावात (तालुका संडीला) जाऊन शफीकला १७ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले. त्याला ‘बोलते’ केल्यानंतर त्याने या दुहेरी हत्याकांडाची कबुली दिली.
सुफिया आणि शफीक हे एकाच मोहल्ल्यातील रहिवासी आहेत. तिचा पती विजयशंकर हा त्याचाही मित्र होता. तिने मुस्लिम असूनही धर्म बदलून आंतरधर्मीय विवाह केला. दोघांनी पळून जाऊन लग्न केल्यामुळे मुलीच्या नातेवाइकांचा शफीकवर रोष होता. आपल्यावर रोष नको म्हणून त्याने १२ सप्टेंबर रोजी डायघरमध्ये येऊन सुफियाच्या घरी मुक्कामही केला. त्याच रात्री त्याने विजयशंकरसमवेत मद्यही प्राशन केले. विजयशंकर आणि सुफिया दोघेही झोपल्यानंतर त्यांच्यावर चाकूने वार केले. अतिरक्तस्राव आणि वर्मी घाव लागल्याने दोघांचाही मृत्यू झाल्यानंतर तिथून पलायन केल्याचे शफीकने पोलिसांना सांगितले. शफीकने सुफियाच्या माहेरच्या लोकांच्या इशाऱ्यावरून हे कृत्य केले आहे का? त्याला यात आणखी कोणी साथ दिली? याही बाबींचा तपास सुरू आहे. घटनास्थळावरून त्याचे रक्ताळलेले कपडेही ताब्यात घेतल्याचे उपायुक्त मणेरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>मरते दम तक...
आधी विजयशंकरच्या गळ्यावर वार झाल्याने त्याला जाग आली. त्या वेळी शफीक हा सुफियावर वार करीत असल्याचे त्याने पाहिले. तो ओरडण्याचा प्रयत्न करीत असताना वार झाल्यामुळे त्याला ओरडताही येत नव्हते.
मात्र, तशाही अवस्थेत हातानेच इशारे करून तिच्यावर वार न करण्याची त्याने विनवणी केली. परंतु, अंगात सैतान संचारलेल्या शफीकने कोणताही मागचापुढचा विचार न करता तिच्याही मानेवर आणि पोटावर वार केले.
विजयशंकर मात्र तिला वाचवण्यासाठी मरते दम तक प्रयत्न करीत राहिला. त्याच्यावर शफीकने आणखी एक वार केल्यामुळे त्याची तीही धडपड निष्प्रभ ठरली.
>तिच्या पोटावर चाकूचे वार
हे हत्याकांड शफीकने इतक्या निर्घृणपणे केले की, नऊ महिन्यांची गरोदर असलेल्या सुफियावर त्याने वार करताना कोणताही विचार केला नाही. तिच्या पोटावर वार झाल्याने तिच्या गर्भपिशवीतील गर्भाचे पाय बाहेर आल्याचे हृदयद्रावक चित्र पोलिसांना पाहायला मिळाले होते.