Prakash Ambedkar | अंधेरी पोटनिवडणूक: ठाकरे गट की भाजपा... पाठिंबा कोणाला? प्रकाश आंबेडकर म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 11:36 PM2022-10-14T23:36:44+5:302022-10-14T23:37:34+5:30
Prakash Ambedkar: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील बंडखोरी सर्व देशाने पाहिली. त्यानंतर आता राज्यात अंधेरीच्या पोटनिवडणुकीची चर्चा रंगली आहे. या निवडणुकीसाठी ...
Prakash Ambedkar: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील बंडखोरी सर्व देशाने पाहिली. त्यानंतर आता राज्यात अंधेरीच्या पोटनिवडणुकीची चर्चा रंगली आहे. या निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपाकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीसाठी ठाकरे गटाला काँग्रेस, राष्ट्रवादीसह कम्युनिस्ट पक्षानेही पाठिंबा जाहीर केला आहे. तर भाजपाच्या उमेदवाराला शिंदे गटाचा पाठिंबा आहे. अशा वेळी वंचित बहुजन आघाडी नक्की कोणाला पाठिंबा देणार, याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी मत मांडले.
प्रकाश आंबेडकर हे शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) यवतमाळमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे देत होते. त्यावेळी त्यांना, अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपा की ठाकरे गट.. नक्की कोणाला पाठिंबा देणार, असा प्रश्न विचारण्यात आला. याबाबत बोलताना त्यांनी सूचक उत्तर दिले. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आम्ही वेट अँड वॉच भूमिकेत आहोत. मला वाटतं ही निवडणूक शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी महत्त्वाची आहे. या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्याकडे कोणीही पाठिंबा मागितला नाही. त्यामुळे आम्ही कोणतीही भूमिका घेतलेली नाही,” असे स्पष्ट उत्तर त्यांनी दिले.
ऋतुजा लटकेंनी अर्ज भरला, शक्तीप्रदर्शनही केले!
१६६, अंधेरी ( पूर्व ) विधानसभा मतदारसंघात येत्या ३ नोव्हेंबरला येथील दिवंगत आमदार कै. रमेश लटके यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने स्वीकारला. त्यानंतर अंधेरी पूर्व मालपा डोंगरी क्रमांक ३ गणेश मंदिर येथे निवडणुकीचा नारळ फोडला. येथून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. मग त्यांनी अंधेरी पूर्व, गुंदवली म्युनिसिपल शाळा (मांजरेकर वाडी) या ठिकाणी आपला निवडणूक अर्ज भरला.