Andheri Bypoll 2022: 'भाजपने निवडणुकीतून माघार घेतली, आता शंका घेणे योग्य नाही', शरद पवार स्पष्टचं बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 06:39 PM2022-10-17T18:39:07+5:302022-10-17T18:39:33+5:30
Andheri Bypoll 2022: 'भाजपचा निर्णय स्वागतार्ह, याचा मला आनंद आहे.'
मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजप-शिंदे गट आणने-सामने आले होते. पण, आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आवाहनानंतर भाजपने पोटनिवडणुकीतून माघार घेतली. यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यातच शरद पवार यांनीही भाजपच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली.
अंधेरी पोटनिवडणुकीतून अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घेतला. आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्राद्वारे माघार घेण्याचे आवाहन केले होते. त्यांच्यापाठोपाठ शरद पवार यांनीही अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली होती. त्यांनी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीची आठवण करुन दिली होती. यानंतर भाजपने माघार घेण्याचा निर्णय घेतला.
शरद पवार काय म्हणाले?
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल याची मला खात्री होती. अखेर आज भाजपाने या निवडणुकीतून माघार घेतली. हा निर्णय स्वागतार्ह आहे. याचा मला आनंद आहे. एकदा त्यांनी माघार घेतली आहे त्यावर शंका किंवा इतर काही बोलणे योग्य नाही. https://t.co/Xj347caNhX
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 17, 2022
भाजपने आज अखेरच्या दिवशी निवडणुकीतून माघार घेतली. भाजपच्या माघारीच्या निर्णयावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहीजण याला योग्य म्हणत आहेत, तर काहीजण या निर्णयावरुन भाजपवर टोला लगावत आहेत. यातच शरद पवार म्हणाले की, "अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल याची मला खात्री होती. अखेर आज भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली. हा निर्णय स्वागतार्ह आहे. याचा मला आनंद आहे. एकदा त्यांनी माघार घेतली आहे, त्यावर शंका किंवा इतर काही बोलणे योग्य नाही," अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.
"मुळात ही पोटनिवडणूक आहे. रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे ही निवडणूक होत आहे. त्यांच्या पत्नीला जागा मिळणार अशी शक्यता होती. आधी निर्णय घेतला असता तर फायदा झाला असता का, तर निर्णय आता झाला किंवा आधी झाला, यापेक्षा निर्णय घेतला हे महत्त्वाचे आहे," असेही शरद पवार म्हणाले.
भाजपला पराभव दिसत होता-जयंत पाटील
भाजपच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच ऋतुजा लटके उभ्या राहू नये म्हणून प्रयत्न सुरू होते. त्यानंतर त्यांचा राजीनामा मंजूर होऊ नये, यासाठी अनेक अडथळे आणले गेले. शेवटी त्यांना कोर्टात धाव घ्यावी लागली. या सर्वांमुळे अंधेरीत ऋतुजा लटके यांच्या बाजूने वातावरण निर्मिती झाली होती. भाजपाला माहिती होते की, इथे आपला पराभव होणार आहे. पराभवाची खात्री झाल्यानंतर भाजपाने निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.