अंधेरी, घाटकोपर सर्वात गर्दीचे

By Admin | Published: June 9, 2016 02:36 AM2016-06-09T02:36:34+5:302016-06-09T02:36:34+5:30

रेल्वे प्रवाशांचा प्रवासही सुकर करण्यासाठी मेट्रो-१ प्रकल्प दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला.

Andheri, Ghatkopar is the most crowded | अंधेरी, घाटकोपर सर्वात गर्दीचे

अंधेरी, घाटकोपर सर्वात गर्दीचे

googlenewsNext


मुंबई : घाटकोपर ते वर्सोवा या पट्ट्यातील वाहतूककोंडीतून सुटका करण्यासाठी आणि रेल्वे प्रवाशांचा प्रवासही सुकर करण्यासाठी मेट्रो-१ प्रकल्प दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्याला प्रवाशांनी थोडाफार का होईना, चांगला प्रतिसाद दिला आहे. घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा या मार्गावरील अंधेरी आणि घाटकोपर ही स्थानके गर्दीची ठरली आहेत. या दोन्ही स्थानकांच्या प्रवासी संख्येत जवळपास १३ ते १४ टक्के वाढ झाल्याची माहिती मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून देण्यात आली. मेट्रोला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने मेट्रो वन प्रशासनाकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी ही माहिती देण्यात आली.
४,५०० कोटी रुपये खर्चून दोन वर्षांपूर्वी घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा अशी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली. मेट्रो सुरू झाल्यावर सुरुवातीला रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या २ लाख ४० हजार एवढी होती. त्यानंतरच्या काही दिवसांत हा आकडा वाढून ३ लाख झाला, तर शनिवार आणि रविवारी येणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असल्याने, प्रवाशांचा आकडा आणखीच वाढून तो ५ लाख एवढा झाला. त्यामुळे सुरुवातीला मेट्रोतून १ कोटी प्रवाशांनी प्रवास केला. आता याच मेट्रोचे भाडे हे १0 ते ४0 रुपयांपर्यंतचे आहे, तरीही हे भाडे परवडत असल्याने, मेट्रोला प्रवाशांकडून अद्यापही पसंती देण्यात येत आहे. आतापर्यंत १८ कोटी ३ लाख प्रवाशांनी प्रवास केल्याचे मेट्रोचे सीईओ अभय कुमार मिश्रा यांनी सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे, अंधेरी आणि घाटकोपर ही स्थानके सर्वात गर्दीची स्थानके ठरत आहेत. पहिल्या वर्षी अंधेरी स्थानकातून दररोज ५३ हजार ६१५ प्रवासी प्रवास करत होते. हीच संख्या ६0 हजार ९९८ एवढी झाली आहे, तर घाटकोपर स्थानकातही पहिल्या वर्षी दररोज ७२ हजार ५२६ प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये १३ टक्के वाढ होऊन, आता दुसऱ्या वर्षी दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ८२ हजार २१६ एवढी झाली आहे, तर एअरपोर्ट रोड, मरोळ नाका, साकीनाका या स्थानकांतूनही प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करत असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.
>मेट्रो प्रशासन सांगते...
मुंबई मेट्रोचा वक्तशीरपणा हा ९९.९ टक्के एवढा आहे. ही जगातील सर्वोत्तम सेवा असल्याचा दावा केला आहे.
आठवड्याच्या एखाद्या दिवशी सरासरी तीन लाखांपर्यंत प्रवासी संख्या जाते.
>‘गो ग्रीन गो क्लीन’ मोहीम
दोन वर्षे झाल्यानिमित्त मेट्रो प्रशासनाकडून ‘गो ग्रीन गो क्लीन’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून मेट्रो स्थानकांच्या छतांवर आणि डेपोत सोलार पॅनल बसविण्यात येणार असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. मेट्रो डेपोतील चार ठिकाणी आणि सर्व १२ स्थानकांमध्ये हे पॅनल बसविण्यात येईल. या सोलार पॅनलमधून विद्युतनिर्मिती केली जाणार असून, त्याचा वापर लाइट, एअर कंडिशन आणि देखभाल-दुरुस्तीसाठी होणार असल्याचे ते म्हणाले.
उत्पन्न वाढविण्यावर भर
सध्या मेट्रोचा चालनीय खर्च हा १४ ते १५ कोटी आहे, तर काढलेल्या कर्जावर महिन्याला जवळपास १७ ते १८ कोटींचे व्याज द्यावे लागत आहे. त्याचप्रमाणे, महिन्याला फक्त १८ कोटींचा महसूल मिळत आहे. जाहिरातींच्या माध्यमातून पहिल्या वर्षी ९ कोटी रुपये मिळाले होते, दुसऱ्या वर्षी १२ कोटी मिळाले असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Andheri, Ghatkopar is the most crowded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.