रत्नागिरीतील सुपुत्राने बनवले 'अँण्ड्रॉईड अँप'

By admin | Published: April 25, 2015 09:07 AM2015-04-25T09:07:04+5:302015-04-25T09:07:14+5:30

मराठीत खूप काही लिहायचं आहे, लिहायची गुणवत्ताही आहे, पण लिहिणार कुठं आणि ते वाचणार कोण? असा प्रश्न पडलेल्या हजारो तरूणांना अक्षय गिरीश पटवर्धन या तरूणाने 'मराठी कट्टा'वर बोलावले आहे.

The Android app made by the son of Ratnagiri | रत्नागिरीतील सुपुत्राने बनवले 'अँण्ड्रॉईड अँप'

रत्नागिरीतील सुपुत्राने बनवले 'अँण्ड्रॉईड अँप'

Next

 अक्षय पटवर्धन :'मराठी कट्टा'वर लेखन अन् वाचनाचा आनंद


रत्नागिरी : मराठीत खूप काही लिहायचं आहे, लिहायची गुणवत्ताही आहे, पण लिहिणार कुठं आणि ते वाचणार कोण? असा प्रश्न पडलेल्या हजारो तरूणांना उत्तर दिलंय ते रत्नागिरीतील एका हरहुन्नरी तरूणानं! अक्षय गिरीश पटवर्धन या तरूणाने अशा तरूणांना 'मराठी कट्टा'वर बोलावले आहे. अक्षयने बनवलेले हे अँप मराठी लिहिणार्‍या आणि वाचणार्‍या दोघांसाठीही खूषखबर ठरले आहे.
अक्षय हा मूळचा रत्नागिरीतील गोडाऊन स्टॉप येथील राहणारा. दहावीपर्यंतचे शिक्षण फाटक हायस्कूल येथे घेतले व त्यानंतर अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातून त्याने बारावी केली. अगदी तुमच्या आमच्यासारखाच भविष्याची स्वप्नं डोळ्यात घेऊन तो त्याची शैक्षणिक वाटचाल करत आहे. बारावीनंतर भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नवी मुंबई येथे त्याने प्रवेश घेतला. संगणक अभियंता होण्याची ओढ त्याच्या मनात होती. शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करतानाच इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करावं, पदवी घेऊन नोकरी हा धोपटमार्ग स्वीकारण्यापेक्षा स्वत: काही कल्पना अंमलात आणाव्यात, अशी त्याची पूर्वीपासूनचीच इच्छा होती. कॉलेजमध्ये भेटलेल्या त्याच्यासारख्याच काही मित्रमैत्रिणींसोबत निन्जा ऑनलाईन सर्व्हिसेस् हा उपक्रम लवकरच सत्यात उतरला.
गेले दीड वर्ष अक्षय आपल्या याच मित्रमैत्रिणींसोबत वेगवेगळी अँण्ड्रॉईड अँप्स आणि वेबसाईटस् बनवतो आहे. आजही तो इंजिनिअर नाही, त्याच्या हातात पदवी प्रमाणपत्र नाही.. परंतु त्याने आपल्या ज्ञान व गुणवत्तेच्या आधारावर मिळवलेले यश कौतुकास पात्र आहे.
सज्जनगड समितीसाठी बनवलेली दासबोध, मनाचे श्लोक व आत्माराम ही तीन अँप्स त्याच्या या वाटचालीतील मैलाचा दगड ठरली आहेत. त्यानंतर डॉ. सुनील पटवर्धन व क्षिप्रा पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने नुकतेच होमिओपॅथी तुमच्या हाती हे अँप 'प्ले स्टोअर'वर लाँच केले आहे. त्याच्या नवीन 'मराठी कट्टा' या अँपचे बोधचिन्ह रत्नागिरीतीलच तरूणी सिद्धी भोंगले हिने तयार केले आहे.
मराठी शाळेत शिकल्यामुळे अक्षयला पहिल्यापासूनच मराठी साहित्याविषयी प्रेम होते. वडील शिक्षक असल्याने त्याच्या या आवडीला घरातूनही प्रोत्साहन मिळाले. चांगले मराठी साहित्यप्रकार (कविता, गझल, स्फूटलेखन, मुक्तक, ललित) लिहिणार्‍या सृजनशील मित्रांसाठी काहीतरी करावे, असे त्याच्या मनात होते. त्यांना फेसबुक, जीप्लस याव्यतिरिक्तही दज्रेदार व्यासपीठ मिळावं, यादृष्टीने त्याचे प्रयत्न चालू होते.
यातूनच मराठी कट्टा ही संकल्पना अवतरली. दि. १६ एप्रिल रोजी हे अँप प्लेस्टोअरवर मोफत उपलब्ध झाले. या अँपमध्ये कौस्तुभ आठल्ये, शैलेश मेहेंदळे, विक्रम मोहिते यांच्या काही रचना आज वाचनासाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर इतरही मराठी नवोदित लेखक आणि कवी या अँपसाठी लिखाण करू शकतात. हे अँप डाऊनलोड केल्यावर आपण सादर करा, या पर्यायाखाली आपले लिखाण अँडमिन पॅनेलपर्यंत पोहोचवू शकतो. आजघडीला फेसबुक किंवा इतर सोशल मिडिया इतके हे अँप सर्वदूर पोहोचले नसले तरी लवकरच त्याची लोकप्रियता वाढेल, असा विश्‍वास अक्षयला आहे.
या मराठी कट्टय़ाच्या माध्यमातून आपण आपले साहित्य चोखंदळ रसिकांपर्यंत थेट पोहोचवू शकता. आजकालच्या घाईच्या जीवनपध्दतीत वाचनासाठी वेगळा वेळ काढणे शक्य नाहीे. तरीही प्रवासात, विरंगुळ्याच्या वेळी 'मराठी कट्टा'द्वारे वाचनाचा आनंद लुटता येऊ शकतो, असे अक्षय सांगतो. (प्रतिनिधी) ■ अक्षय पटवर्धनला अँप्स बनवण्याचा छंद.
■ दासबोध, मनाचे श्लोक, आत्मारामसह होमिओपॅथी तुमच्या हाती अँप केले तयार.
■ नवोदित लेखकांसह वाचकांनाही हक्काचं व्यासपीठ.

Web Title: The Android app made by the son of Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.