राज्यातील अंगणवाड्यांचे सोमवारपासून कामबंद, कर्मचा-यांचा बेमुदत संप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 10:43 PM2017-09-10T22:43:15+5:302017-09-10T22:43:23+5:30
राज्यातील दोन लाख 10 हजार अंगणवाडी कर्मचारी सोमवारपासून (11 सप्टेंबर) बेमुदत संपावर जात आहेत. त्यामुळे अंगणवाडय़ा उघडणार नाहीत. अब्दुल कलाम आहाराचे काम करणार नाही, पल्स पोलिओ लसीकरण आदी कामे राज्यात कोठेही होणार नसल्याचे येथील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचे निमंत्रक बृजपाल सिंह यांनी लोकमतला सांगितले.
ठाणे, दि. 10 - राज्यातील दोन लाख 10 हजार अंगणवाडी कर्मचारी सोमवारपासून (11 सप्टेंबर) बेमुदत संपावर जात आहेत. त्यामुळे अंगणवाडय़ा उघडणार नाहीत. अब्दुल कलाम आहाराचे काम करणार नाही, पल्स पोलिओ लसीकरण आदी कामे राज्यात कोठेही होणार नसल्याचे येथील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचे निमंत्रक बृजपाल सिंह यांनी लोकमतला सांगितले.
अधिकारीवर्गाच्या दादागिरीला घाबरणार नाही. कृती समिती संघटनेवर विश्वास असल्याचा निर्धार अंगणवाडी सेविकांनी व्यक्त करून बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे. संपाच्या कालावधीदरम्यान 12 सप्टेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे राज्यस्तरीय मोर्चात अंगणवाडीसेविका शिस्तीत सहभागी होऊन हक्काची मागणी लावून धरणार आहेत. यासाठी सर्व अंगणवाडीसेविका लाल रंगाची साडी परिधान करून मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चात सहभागी होणा-या अंगणवाडी सेविकांमध्ये मुंबईच्या रस्त्यांची वाहतूक कोंडी करण्याची ताकद असल्याचे ब्रिजपाल सिंह यांनी सांगितले.
या बेमुदत संपाचा परिणाम ठाणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांसह कुपोषित बालकांच्या पोषण आहार वितरणावर होणार आहे. जिल्ह्यात एक हजार 854 अंगणवाडी केंद्रे आहेत. त्याद्वारे ठाणे, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, मुरबाड, डोळखांब, शहापूर आदी नऊ बाल प्रकल्पांतील सुमारे एक लाख 15 हजार बालकांसह आठ हजार 471 कुपोषित व 139 तीव्र कुपोषित बालकांच्या अंगणवाडी सेवेवर परिणाम होणार आहे.