अंगणवाडी आहाराच्या पाकिटांवर खाडाखोड
By admin | Published: January 12, 2017 04:19 AM2017-01-12T04:19:13+5:302017-01-12T04:19:13+5:30
येथील औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात अंगणवाडी पोषक आहाराच्या पाकिटावरील तारखा बदलल्या जात
वसई : येथील औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात अंगणवाडी पोषक आहाराच्या पाकिटावरील तारखा बदलल्या जात असल्याचा प्रकार उजेडात आला आहे, तसेच मुदतबाह्य आणि विना तारखेची हजारो खाद्यपाकिटेही आढळून आली. पोलिसांनी हा माल जप्त करून पुढील तपासासाठी अन्न व प्रशासन खात्याकडे पाठविला आहे.
हा प्रकार उजेडात आल्यामुळे वसईत अंगणवाड्यांना पुरवल्या जाणाऱ्या आहाराबाबत संशय निर्माण झाला आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी महिला बाल विकास विभागातर्फेएकात्मिक बाल विकास सेवा योजना राज्यभर राबविली जाते. अंगणवाडीमधील ३ महिने ते सहा वर्षांच्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सूक्ष्म तत्त्वपोषक आहार दिला जातो. तो बनविण्याचे ठेके कंत्राटी पद्धतीने दिले जातात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम शासनाचे आहे, पण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे या प्रकारावरून उघड झाले आहे. ठेकेदार केवळ नफ्याचा व्यापार म्हणून या पोषक आहार निर्मितीकडे पाहतात. त्यामुळे हा आहार किती पोषक असतो? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वालीव येथील महावीर इंडस्ट्रिजमधील एका कारखान्यात वसई-विरार महानगरपालिकेचे कर अधिकारी मिलिंद पाटील करवसुलीसाठी आपल्या पथकासह गेले होते. त्या वेळी कारखान्यात पोषक आहारांच्या पाकिटावरील तारीख थिनरने पुसून, दुसरी तारीख टाकण्याचे काम कामगार करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर, या ठिकाणी सुरू असलेले बालकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारे अनेक प्रकार उजेडात आले.
या पोषण आहाराच्या पुरवठादार शलाका महिला मंडळ आहेत. या कारखान्यात खाद्यपदार्थांच्या पाकिटावरील डिसेंबर महिन्यातील तारीख थिनरच्या सहाय्याने पुसून, त्यावर जानेवारी महिन्यातील तारीख टाकली जात होती. एका टेम्पोत विना तारखेची हजारो पाकिटे आढळून आली, तसेच डिसेंबरची मुदत संपलेली पाकिटे गोदामाबाहेर नेण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी या टेम्पोसह थिनरच्या बाटल्या आणि तारखेचा स्टँप जप्त केला व आहाराची पाकिटे अन्न आणि औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी पाठविला आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणी अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान, यात कोणताही गैरप्रकार झालेला नाही. पाकिटावर तारीख चुकीची टाकली गेल्याने ती बदलण्याचे काम केले जात होते, असे बचत गटाचे प्रतिनिधी योगेश माने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
प्रशासनाचे नियंत्रण नाही
कुपोषणावर मात करण्यासाठी महिला बाल विकास विभागातर्फेएकात्मिक बाल विकास सेवा योजना राज्यभर राबविली जाते. अंगणवाडीमधील ३ महिने ते सहा वर्षांच्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सूक्ष्म तत्त्वपोषक आहार दिला जातो. तो बनविण्याचे ठेके कंत्राटी पद्धतीने दिले जातात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम शासनाचे आहे, पण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे या प्रकारावरून उघड झाले आहे.