राज्यातील अंगणवाडीसेविकांचे उद्या ‘टाळ-भजन’ आंदोलन!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 12:47 AM2020-01-31T00:47:54+5:302020-01-31T00:48:12+5:30
एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये राज्यभरातील एक लाख अंगणवाडीसेविका व एक लाख मदतनीस आदी दोन लाख महिला कर्मचारी काम करीत आहेत.
ठाणे : राज्यातील तब्बल दोन लाख अंगणवाडीसेविकांचे नोव्हेंबरपासून मानधन रखडल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. हे थांबवण्यासाठी आणि रखडलेल्या कष्टाच्या मानधन प्राप्तीसाठी राज्यभरातील शेकडो सेविका नवी मुंबईतील रायगड भवन या आयुक्त कार्यालयावर धडक मारून टाळ-भजन धरणे आंदोलन १ फेब्रुवारीला करणार आहेत.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये राज्यभरातील एक लाख अंगणवाडीसेविका व एक लाख मदतनीस आदी दोन लाख महिला कर्मचारी काम करीत आहेत. या सेविकांना आठ हजार ५०० व मदतनीस यांना साडेचार हजार रुपये अत्यल्प मानधन आहे. परंतु, ते प्रत्येक महिन्यास मिळत नसल्यामुळे या सेविकांना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. नोव्हेंबर महिन्यापासून या सेविका मानधनापासून वंचित आहेत. त्यामुळे या सेविका उपासमारीला तोंड देत आहेत. आर्थिक विवंचनेत सापडल्यामुळे परभणी जिल्ह्यातील कोंडी गावामधील सुमित्रा खुडे या सेविकेने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येवरून उपासमारीची झळ निदर्शनात येत आहे.
मानधनाअभावी हाल
महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली या सेविका निद्रिस्त आयुक्त कार्यालय प्रशासनास जागे करण्यासाठी कार्यालयाबाहेर टाळ-भजन धरणे आंदोलन छेडणार असल्याचे या कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी लोकमतला सांगितले. या हक्काच्या मानधनासाठी कर्मचारी संघाने मंत्रालय, ठिकठिकाणच्या जिल्हा परिषदांवर मोर्चा काढला होता. त्यांच्या पदरात काहीच पडले नाही.