अंगणवाडी सेविकांनी तुटपुंजी वाढ नाकारली, १५०० रुपयांच्या मानधनवाढीनंतर कृती समिती आंदोलनावर ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 06:11 AM2017-09-23T06:11:05+5:302017-09-23T06:11:10+5:30
अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपामुळे राज्य सरकारने त्यांच्या मानधनात शुक्रवारी १५०० रुपयांची वाढ केली असली, तरी ती अपुरी असल्याचे सांगत, संप कायम ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपामुळे राज्य सरकारने त्यांच्या मानधनात शुक्रवारी १५०० रुपयांची वाढ केली असली, तरी ती अपुरी असल्याचे सांगत, संप कायम ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतला आहे.
अंगणवाडी कर्मचा-यांचे मानधन तीन हजार रुपयांनी वाढवावे, या मागणीसाठी सेविकांनी ११ सप्टेंबरपासून संप पुकारला आहे. त्याची दखल घेत, अंगणवाडी मदतनिसांचे मानधन २५०० रुपयांवरून ३ हजार ५०० रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ३ हजार २५० रुपयांवरून ४ हजार ५०० रुपये करण्यात आल्याचे महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केले. या मानधानवाढीनंतर २५ टक्के अंगणवाडी सेविका कामावर रूजू झाल्याचा दावाही पंकजा मुंडे यांनी केला.
भाऊबीज वाढविली
शासनामार्फत अंगणवाडी कर्मचा-यांना दरवर्षी १ हजार रुपयांची भाऊबीज दिली जाते. या रक्कमेत दुपटीने वाढ करून, २ हजार रुपये देण्यात येणार आहेत.
>अंगणवाड्या बंदच राहणार!
शेतकºयांच्या आंदोलनाप्रमाणेच सरकार कुटील डाव खेळून संप फोडण्याची प्रयत्न करत आहे. त्यामुळेच कृती समितीबाहेरील एका छोट्या संघटनेला हाताशी घेऊन, चर्चा करण्याचा देखावा सरकारने केला आहे.
या डावाला कर्मचारी भुलणार नाहीत. मोठे संख्याबळ असलेल्या संघटना आमच्या कृती समितीमध्ये असून, सरकारच्या तुटपुंज्या वाढीने संप मागे घेणार नाही. यापुढेही अंगणवाड्या बंदच राहतील, असे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे निमंत्रक एम. ए. पाटील यांनी सांगितले.