अंगणवाडीसेविकेची परभणीमध्ये आत्महत्या, पाच महिन्यांपासून नव्हता झाला पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 05:21 AM2017-11-08T05:21:08+5:302017-11-08T05:21:20+5:30
पाच महिने पगार न मिळाल्याने आर्थिक हलाखीत असलेल्या व सर्व नोंदी अद्ययावत करण्याच्या तणावातून अंगणवाडी सेविकेने गळफास घेऊन आत्महत्या केली. जिंतूर तालुक्यातील बोर्डी येथे मंगळवारी ही घटना उघडकीस आली.
परभणी : पाच महिने पगार न मिळाल्याने आर्थिक हलाखीत असलेल्या व सर्व नोंदी अद्ययावत करण्याच्या तणावातून अंगणवाडी सेविकेने गळफास घेऊन आत्महत्या केली. जिंतूर तालुक्यातील बोर्डी येथे मंगळवारी ही घटना उघडकीस आली.
पगार न झाल्याने पोट भरण्याची भ्रांत असताना बैठका कशा घ्यायच्या? त्याचा खर्च कोठून करायचा, असा सवाल सुमित्रा भगवानराव राखुंडे (५४) यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे. नांगणगाव येथील अंगणवाडीमध्ये २००१ पासून त्या मदतनीस म्हणून कार्यरत होत्या. पंचायत राज समिती ८ नोव्हेंबरपासून परभणी जिल्हा दौºयावर येत आहे.
त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे. कागदपत्रे तयार करण्याच्या तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
नांगणगाव अंगणवाडीमध्ये १०० रुपये मानधनापासून काम सुरू केले. आता एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाकडून २००८ ते २०१७ या १० वर्षांचे रजिस्टर उपलब्ध करून देण्याची मागणी केली. परंतु, अंगणवाडी मंदिरात भरवित होते. त्यामुळे २००८ ते २०१२ चे रजिस्टर मंदिरातच ठेवले जात होते. ते गायब झाले आहेत. जून ते आॅक्टोबरचा पगार झाला नाही. दिवाळी तशीच गेली, असे चिठ्ठीत लिहिले आहे.