कर्करुग्णांचे ‘देवदूत’
By admin | Published: May 1, 2017 05:25 AM2017-05-01T05:25:49+5:302017-05-01T05:25:49+5:30
पांढरा शुभ्र सदरा-लेंगा...मदतीसाठी सतत वाजणारा मोबाईल ही हरखचंद सावला या देवदूताची खरी ओळख...गेली तब्बल ३२ वर्षे त्यांनी
स्नेहा मोरे / मुंबई
पांढरा शुभ्र सदरा-लेंगा...मदतीसाठी सतत वाजणारा मोबाईल ही हरखचंद सावला या देवदूताची खरी ओळख...गेली तब्बल ३२ वर्षे त्यांनी नि:स्वार्थीपणे कर्करुग्णांच्या सेवेचे व्रत स्वीकारले आहे. सावला यांनी परळच्या भूमीत रुजविलेल्या ‘जीवनज्योती’ ट्रस्टचा वटवृक्ष झाला आहे.
जीवनज्योती’ ही संस्था सेंट जॉर्जेस, कामा, जे. जे आणि टाटा रुग्णालय येथे सुमारे ७००- ८०० रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळचे जेवण देते. त्यात लहानग्या कर्करुग्णांनाही शाळेत जाऊन जेवण देण्यात येते. औषध बँक, सिक बेड सर्व्हिस, लहान मुलांसाठी टॉय बँक (खेळणी पुरवणे) आणि कृत्रिम अवयव बनवून देणे अशा अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून कर्करुग्णांचा आधारवड म्हणून महत्त्वाची भूमिका संस्था बजावत आहे. संस्था आता विस्तारली असून मुलूंड (मुंबई, ठाणे, जळगाव आणि कोलकाता येथेही संस्थेच्या शाखा आहेत.
सावला यांचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होतो. योग, व्यायाम इत्यादी नित्यक्रम आटोपल्यावर ते साडेआठ वाजता काम सुरू करतात. मग दिवसभरात जशी गरज असेल त्याप्रमाणे सेवा करतात. सकाळी सुरु केलेले काम अविरतपणे रात्री १०.३० पर्यंत सुरु असते. कर्करुग्णांप्रमाणे ते रस्त्यावरील भिकाऱ्यांची देखभाल करतात. गरज भासल्यास त्यांना रुग्णालयातही दाखल करतात. सावला यांच्यासोबत त्यांची मुले चिंतन आणि नियासा जमेल तसा हातभार लावतात. शिवाय, त्यांच्या पत्नी निर्मला यांच्या पाठिंब्यामुळेच हे सर्व कार्य शक्य झाल्याचे सावला अभिमानाने सांगतात.
प्रायश्चित्तामधून सुरू झाला प्रवास
सावला यांना एका मायलेकीने टाटा रुग्णालयाचा पत्ता विचारला. मात्र, त्यांनी पालिकेच्या शीव येथील पालिका रुग्णालयाचा पत्ता दिला. टाटा रुग्णालयात कर्करुग्णांवर उपचार केले जातात, हे त्यावेळी त्यांना कळले नाही. ‘टाटा’ रुग्णालयाविषयी माहिती नसल्याची सल त्यांच्यात तशीच राहिली. त्या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून कर्करुग्णांना मदत करण्याचा वसाच त्यांनी घेतला.
मुक्या जिवांचीही काळजी
संस्थेतर्फे प्राणी-पक्ष्यांचीही काळजी घेतली जाते. मुंबईतील २६ जुलैच्या प्रलयानंतर वेगवेगळ््या ठिकाणांहून आणलेल्या ३ हजार जखमी कबुतरांची त्यांनी काळजी घेतली होती. त्यांना अन्न-पाणी देत त्यांचे प्राण वाचवले. जखमी, आजारी पशु-पक्ष्यांवर संस्थेतर्फे मोफत उपचार करण्यात येतात.
१०२ वेळा रक्तदान
सावला यांनी आतापर्यंत १०२ वेळा रक्तदान केले आहे. कोणत्याही रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास त्वरित रक्तदान करण्याची त्यांची तयारी असते. त्यांना १०६ हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. पण त्यांनी स्वत:ला झगमगाटापासून दूर ठेवले आहे.
अंत्यसंस्काराचीही सेवा
रुग्ण दगावला, नातेवाईक निघून गेले किंवा मृताचे नातेवाईक नसतील तर ते अंत्यसंस्काराचे कामदेखील करतात. कर्करोगामुळे अपंग झालेल्या रुग्णांना आधारासाठी इतरांची गरज भासते. त्यासाठी ते कृत्रिम अवयवदेखील मिळवून देतात.
पॉकेटमनीपासून सुरुवात
स्वत:च्या पॉकेटमनीपासून त्यांनी हे कार्य सुरु केले. कामाचा व्याप वाढत होता तशी त्यांना पैशांची चणचण भासू लागली. त्यांनी घराघरांतून जुने कपडे, भांडी, औषधे गोळा केली. जुन्या कपड्यांपासून गोधड्या शिवल्या आणि रुग्णांना त्या थंडीच्या काळात दिल्या. वर्तमानपत्रांची रद्दी विकूनसुद्धा त्यांनी निधी गोळा झाला. त्यातून रुग्णांना पावसाळ््यात छत्र्या पुरविल्या. आता कार्याचा विस्तार झाल्याने समाजातील दानशूर व्यक्तीही सहभाग दर्शवित आर्थिक मदत करत असतात.