शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेने संताप; कन्नड फलक फाडले, मिरजेत कर्नाटकच्या वाहनांवर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 05:21 AM2021-12-19T05:21:45+5:302021-12-19T05:22:59+5:30

या घटनेला क्षुल्लक बाब म्हटल्याबद्दल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

anger at the desecration of the statue of shivaji maharaj stones hurled at karnataka vehicles in miraj | शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेने संताप; कन्नड फलक फाडले, मिरजेत कर्नाटकच्या वाहनांवर दगडफेक

शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेने संताप; कन्नड फलक फाडले, मिरजेत कर्नाटकच्या वाहनांवर दगडफेक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर/लातूर/बेळगाव : बंगळुरूजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी सीमावर्ती जिल्ह्यात उमटले. संतप्त जमावाने कर्नाटकी वाहने व व्यावसायिकांची दुकाने लक्ष्य केली. दरम्यान, या घटनेला क्षुल्लक बाब म्हटल्याबद्दल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिरजेत शिवसेना कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील वाहनांवर दगडफेक करीत दोन वाहनांची तोडफोड केली. मिरज पंचायत समिती आवारातील छत्रपतींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन केले. याप्रकरणी नऊजणांना अटक करण्यात आली आहे.
कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वपक्षीयांच्या वतीने निदर्शने करत कर्नाटक सरकारचा निषेध केला. सरकारने कानडी गुंडांवर कारवाई करावी, अन्यथा कर्नाटकची बस महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असाही इशारा दिला.

लातूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी लुंगी फाडून, तर उस्मानाबादमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा समितीने कर्नाटकचा झेंडा जाळून शनिवारी निषेध नोंदविला. कन्नड रक्षक वेदिकेच्या पुतळ्याचेही दहन केले. सोलापुरात शिवप्रेमींनी शिवाजी चौकात एकत्र येत निदर्शने केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही किरकोळ गोष्ट असून, अशा क्षुल्लक गोष्टीसाठी दगडफेक करणे चुकीचे असल्याचे मत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यावरुनही शिवप्रेमीमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शिवछत्रपतींच्या मूर्ती विटंबनेच्या प्रकाराची केंद्र आणि कर्नाटक सरकारने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी खा. संभाजीराजे यांनी केली आहे.

- सरकारने कानडी गुंडांवर कारवाई करावी, अन्यथा कर्नाटकची बस महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असाही इशारा संतप्त नागिरकांनी दिला आहे.

शिवरायांचा कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लक्ष घालावे. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, देशाची अस्मिता आहेत. त्यांच्या पुतळ्याची विटंबना हा देशवासीयांच्या अस्मितेवर हल्ला आहे. कर्नाटक आणि केंद्र सरकारने या घटनेकडे गांभीर्याने पाहावे. - अजित पवार, उपमुख्यमंत्री
 

Web Title: anger at the desecration of the statue of shivaji maharaj stones hurled at karnataka vehicles in miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.