शेतकऱ्यांचा संतप्त सवाल : दूध संस्थांनी कमावली करोडोंची माया; दराचा प्रश्न कधी लागणार मार्गी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2016 12:53 AM2016-04-07T00:53:14+5:302016-04-07T00:53:14+5:30
गेल्या एक वर्षापूर्वी दुधाचा किमान खरेदी दर न दिल्यास फौजदारी करू, असा सज्जड दम दुग्धविकासमंत्री एकनाथराव खडसे यांनी दूध संस्थांना दिला होता.
अवघ्या १७ रुपयांत भरडतोय दूधउत्पादक
सोमेश्वरनगर : गेल्या एक वर्षापूर्वी दुधाचा किमान खरेदी दर न दिल्यास फौजदारी करू, असा सज्जड दम दुग्धविकासमंत्री एकनाथराव खडसे यांनी दूध संस्थांना दिला होता. मात्र राज्यातील काही दूध संघ व मातब्बर संस्थांचा अपवाद वगळता बहुतांश संस्था अवघ्या १७ रुपयांनी शेतकऱ्यांना भरडत आहेत, तर दुसरीकडे दुधाला दर द्या, म्हणणाऱ्या शासनाने गेल्या सव्वा वर्षापासून एकट्या पुणे जिल्ह्यातील दूध पावडरचे करोडो रुपयांचे अनुदान थकविले आहे.
पाण्याची बाटली २० रुपये, तर दूध १७ रुपये हा फार मोठा विरोधाभास आहे. मागील वर्षी खडसे यांनी राज्यातील दूध संस्थांनी दूध उत्पादकांना ३.५ फॅट व ८.५ स्निग्धांशला २० रुपये प्रतिलिटर किमान दर द्यावा; अन्यथा फौजदारी करू असा सज्जड दम भरला आहे. मात्र या इशाऱ्याला घाबरणार दूध संस्थाचालक ते कसले?
दूध पावडरचे दर घसरल्याने अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाल्याने दुधाचे दर घसरले. एकीकडे दूध संघ शासनाच्या नियमाप्रमाणे
३.५ व ८.५ दुधाला २० रुपये दर देत आहेत. मात्र डेअऱ्यांमध्ये दूध उत्पादकांची आर्थिक पिळवणूक करीत १७ रुपयांवरच शेतकऱ्यांना भरडत आहेत.
सध्या मिळणारा दर पाहता दूध उत्पादकांच्या हातात आता शेणाशिवाय काहीच उरत नाही. मात्र दूध संकलन करणाऱ्या दूध संस्थांनी अल्पावधीतच करोडो रुपयांची माया जमवत मजल्यावर मजले बांधले आहेत. यांच्या मुसक्या कोण आवळणार, असाही प्रश्न दूध उत्पादक विचारत आहेत. (वार्ताहर)
दूध उत्पादकांना एक लिटर दूध उत्पादन करण्यामागे १६ ते १८ रुपये खर्च येत आहे. पशुखाद्य ११०० ते १२०० रुपयांवर गेले आहे. चाऱ्याचे दर वाढले आहेत. आता पाणीदेखील विकत घ्यावे लागत आहे. दुधामधील भेसळीवर कडक निर्बंध आणल्यास व दुधाचा शालेय पोषण आहारामध्ये समावेश केल्यास हे दर निश्चितच २५ रुपयांवर जातील, असे दूध व्यवसायातील जाणकार सांगतात.
शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही सध्या २० रुपये दर देत आहोत. भविष्यात दूध धंदा टिकवायचा असेल तर दूध पावडर निर्यात करावी लागेल. तसेच दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांसाठी चारा छावण्या दिल्या तरच दूध उत्पादक शेतकरी वाचणार आहे.
- सोमनाथ होळकर,
अध्यक्ष, बारामती दूध संघ