सीरममधील आगीची घटना दुर्दैवी; माझ्या सहवेदना मृतांच्या कुटुंबियांसोबत; मोदींकडून दु:ख व्यक्त
By कुणाल गवाणकर | Published: January 21, 2021 08:29 PM2021-01-21T20:29:54+5:302021-01-21T20:32:34+5:30
Serum Institute fire: सीरमच्या इमारतीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू; मुख्यमंत्री उद्या आग लागलेल्या आगीची पाहणी करणार
मुंबई: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या इमारतीत लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील सीरमच्या नव्या इमारतीत दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. गेल्याच वर्षी या इमारतीचं उद्घाटन झालं होतं. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
Anguished by the loss of lives due to an unfortunate fire at the @SerumInstIndia. In this sad hour, my thoughts are with the families of those who lost their lives. I pray that those injured recover at the earliest.
— Narendra Modi (@narendramodi) January 21, 2021
सीरम इन्स्टिट्यूटमध्ये झालेली जीवितहानी अतिशय दु:खद आहे. या कठीण समयी माझ्या सहवेदना मृतांच्या कुटुंबांसोबत आहेत. दुर्घटनेत जखमी झालेल्यांची तब्येत लवकर सुधारावीत यासाठी माझ्या प्रार्थना, अशा भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रपती कोविंद यांनीदेखील सीरमच्या इमारतीत लागलेल्या आगीबद्दल आणि जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या पुण्यातल्या इमारतीत लागलेली आग आणि त्यामुळे झालेली जीवितहानी वेदनादायी आहे. माझ्या सहवेदना मृतांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी मी प्रार्थना करतो, अशा भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या आहेत.
The loss of lives in a fire accident at the Serum Institute of India in Pune is distressing. My thoughts and prayers are with the bereaved families. I wish speedy recovery of the injured: President Ram Nath Kovind (file pic) pic.twitter.com/L8Caiix2z2
— ANI (@ANI) January 21, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुण्याला जाऊन सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन आग लागलेल्या युनिटच्या घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. उद्या दुपारी मुख्यमंत्री घटनास्थळी जाऊन पाहणी करतील, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या पुण्यातील इमारतीला आज दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्या शुक्रवार, २२ जानेवारी रोजी दुपारी पुणे येथे @SerumInstIndia च्या प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 21, 2021
सीरमच्या इमारतीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेंनी दिली. "सीरमच्या बीसीजी लस बनवण्याच्या इमारतीला दुपारी दोनच्या सुमारास आग लागलेली आहे. ज्या ठिकाणी बीसीजी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. बिल्डिंगचं काम सुरू होतं. वेल्डिंग स्पार्कमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे. आता आग विझवण्यात आली आहे. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हे मृतदेह नोबेल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहेत,' असं टोपेंनी सांगितलं. कोरोना लसीची निर्मिती जिथे होते, ती इमारत घटनास्थळापासून लांब आहे. त्यामुळे कोरोना लसीचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. यासंदर्भात पोलीस तपास सुरू आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, 'आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या इमारतीचे बांधकाम सुरु होते. तिथे विजेचे आणि वेल्डिंगचे काम सुरु होते, त्यादरम्यान ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मृतांमध्ये इमारतीचे बांधकाम करणारे कंत्राटी कामगार असू शकतात.'
सीरम इन्स्टिट्यूट मोठी लस उत्पादक कंपनी
जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असा सीरम इन्स्टिट्यूटचा नावलौकिक आहे. काही दिवसांपूर्वीच सीरमने कोरोना प्रतिबंधक असलेली कोविशिल्ड लस देशभरात वितरणासाठी उपलब्ध करून दिली आहे. कोविशील्डच्या लसीकरणाची मोहीम देशात सुरू आहे. तसेच, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लस उत्पादन करण्यासाठी सीरम कंपनी प्रयत्नशील आहे.