अनिकेत कोथळे हत्या प्रकरण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष कांबळे निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 08:19 PM2017-12-08T20:19:34+5:302017-12-08T20:21:21+5:30
अनिकेत कोथळे हत्या प्रकरणात पोलीस दलातील अजून एका अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. अनिकेत कोथळेंच्या हत्येबाबत गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष कांबळे यांना निलंबित करण्यात आले आहे.
सांगली - अनिकेत कोथळे हत्या प्रकरणात पोलीस दलातील अजून एका अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. अनिकेत कोथळेंच्या हत्येबाबत गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष कांबळे यांना निलंबित करण्यात आले आहे. याआधी या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह पाच पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. तर सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांची अखेर बद्दली बदली करण्यात आली.
सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबरला लूटमारीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोघांना अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला नग्न करुन उलटा टांगून बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे जंगलात नेऊन जाळला होता. तसेच अनिकेत व अमोल पोलिस कोठडीतून पळून गेल्याचा बनाव रचला होता.
७ नोव्हेंबरला ही घटना उघडकीस आली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याप्रकरणी ८ नोव्हेंबरला बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांना अटक केली होती. सध्या हे सर्वजण न्यायालयीन कोठडीत कळंबा कारागृहात आहेत. या प्रकरणाचा संपूर्ण तपास सीआयडीचे पथक करीत आहे.
दरम्यान, या प्रकरणी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.