अनिकेत कोथळे हत्या : एसआयटीची स्थापना करा; उपअधीक्षक दिपाली काळेंना सहआरोपी करा, याचिका दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 05:00 PM2017-11-24T17:00:06+5:302017-11-24T17:01:24+5:30
अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करावी, तसंच सांगलीचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करावे यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.
सांगली : अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करावी, तसंच सांगलीचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करावे यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी सांगलीचे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधिक्षक डॉ. दीपाली काळे यांची कालच बदली करण्यात आली आहे.
हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी, सीआयडीचे डीआयजी आणि आयपीएस दर्जाचे अधिकारी यांची मिळून एसआयटीची स्थापना करावी आणि न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी या मागण्यांसाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर 4 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. उद्या या मागण्यांसाठी सर्वपक्षीय कृती समितीचा सांगलीत मोर्चा आहे.
सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत दि. ६ रोजी पोलिसांच्या मारहाणीत लूटमारीच्या गुन्ह्यातील अनिकेत कोथळे या संशयिताचा मृत्यू झाला होता. पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांनी सराईत गुन्हेगाराप्रमाणे त्यास नग्न करुन उलटे टांगले व मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याप्रकरणी सर्व पोलिसांना अटक करून सेवेतून बडतर्फ केले आहे. हा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे.
या दरम्यान पोलिसांच्या ‘थर्ड डिग्री’विरुद्ध आणि काराभाराबद्दल सांगलीत आंदोलनांचा भडका उडाला होता. मंत्र्यांपासून अनेक वरिष्ठ अधिका-यांना सांगलीत यावे लागले. यापूर्वी तक्रारी असतानाही पोलिस उपनिरीक्षक कामटेवर कारवाई केली नसल्याचा आरोप करून विविध सामाजिक संघटनांनी पोलिस अधीक्षक शिंदे यांच्या बदलीची मागणी केली होती, तर मृत अनिकेत कोथळेच्या नातेवाईकांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करण्याचा आग्रहही कोथळे कुटुंबियांसह सर्वपक्षीय कृती समितीने धरला आहे. वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी या दोघांबद्दलचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे.
त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (दि. २५) सांगली जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्वत: मुख्यमंत्र्यांनीच शिंदे आणि काळे यांच्या बदलीचा निर्णय घेतल्याचे समजते. गुरुवारी सायंकाळी तसे आदेश काढण्यात आले.