अश्लील सीडीच्या अवैध धंद्याची माहिती समजल्याने अनिकेतची दिली सुपारी, भावाचा धक्कादायक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 10:35 AM2017-11-10T10:35:59+5:302017-11-10T10:39:11+5:30
पोलिसांच्या थर्ड डिग्रीमध्ये मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे हत्याप्रकरणात धक्कादायक माहिती समोर येते आहे.
सांगली- पोलिसांच्या थर्ड डिग्रीमध्ये मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे हत्याप्रकरणात धक्कादायक माहिती समोर येते आहे. अनिकेतची सुपारी देण्यात आल्याचा आरोप त्याच्या भावाने केला आहे. अनिकेत ज्या ठिकाणी काम करत होता तेथे वरच्या मजल्यावर अश्लील सीडी बनविल्या जात होत्या. या अवैध धंद्यांची माहिती अनिकेतला मिळाली होती. ती माहिती तो बाहेर उघड करेल,त्यामुळे त्याची सुपारी युवराज कामटेला देण्यात आल्याचा आरोप अनिकेतच्या भावाने केला आहे.
अनिकेत हा हरभट रोडवरील एका बॅग्ज हाऊसमध्ये कामाला होता. या दुकानदाराने त्याचा पगार दिलेला नाही. त्यामुळे तो पगार मागण्यासाठी गेला असता, त्यांच्यात वाद झाला होता. या दुकानदाराचे व युवराज कामटे याचे जवळचे संबंध आहेत. त्याची या दुकानात ये-जा होती. शिवाय या दुकानाच्या वरच्या माळ्यावर मालक अश्लील चाळे करीत असतो. त्याची माहितीही अनिकेतने कुटुंबीयांना दिली होती. या दुकानदाराने अनिकेतच्या पत्नीलाही धमकी दिली होती. त्यामुळे या प्रकरणात या बॅग्ज हाऊसच्या मालकाचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
अनिकेतवर पोलीस ठाण्यात करणार अंत्यसंस्कार
पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे याचा मृतदेह पोलिसांनी लवकरात लवकर कुटुंबीयांच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी करून, त्याचा मृत्यू झालेल्या ठिकाणी पोलिस ठाण्यातच आम्ही त्याच्यावर अंत्यसंस्कार करणार असल्याचा इशारा कोथळे याच्या कुटुंबीयांनी गुरुवारी दिला. या प्रकरणात शासनाने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, तसेच संशयित आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
बनावट गुन्ह्यात अडकविले
अनिकेत व अमोल या दोघांनाही पोलिसांनी बनावट गुन्ह्यात अडकविल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला. लूटमार प्रकरणातील फिर्यादी संतोष गायकवाड मूळचा कवलापूरचा आहे. तो मुंबईत राहतो. त्याला या दोघांची नावे कशी माहीत? चोरीचा बनाव करून दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यात केवळ अनिकेतलाच मारहाण करण्यात आली. अमोल भंडारेला पोलिसांनी मारहाण केलेली नाही. अनिकेतचा संगनमताने खून करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.