अनिल अंबानी उद्योग समूहाचे मुख्यालय येस बँकेच्या ताब्यात; दोन महिन्यांची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 06:37 AM2020-07-31T06:37:32+5:302020-07-31T06:38:25+5:30
अनिल धिरूभाई अंबानी ग्रुपचे (एडीएजी रिलायन्स सेंटर) हे मुख्यालय सांताक्रूझ पूर्व येथे असून, त्याचे क्षेत्रफळ २१,४३२ चौ. फूट इतके आहे.
मुंबई : आर्थिक संकटात सापडलेले उद्योगपती अनिल अंबानी यांनी २,८९२ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे येस बँकेने त्यांच्या उद्योगसमूहाचे मुंबईतील मुख्यालय ताब्यात घेतले आहे, तसेच दक्षिण मुंबईतील नगिना महाल या इमारतीत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या मालकीच्या दोन सदनिकाही बँकेने ताब्यात घेतल्या आहेत.
अनिल धिरूभाई अंबानी ग्रुपचे (एडीएजी रिलायन्स सेंटर) हे मुख्यालय सांताक्रूझ पूर्व येथे असून, त्याचे क्षेत्रफळ २१,४३२ चौ. फूट इतके आहे. कर्जाची परतफेड साठ दिवसांच्या आत करा, अशी नोटीस येस बँकेने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला ५ मे रोजी बजावली होती; पण कंपनीचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी कर्जफेड न केल्याने येस बँकेने ही कारवाई केली.
येस बँकेकडून अनिल अंबानी यांच्या समूहाने एकूण १२ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यामुळे कर्जवसुलीसाठी येस बँकेने २२ जुलैला अनिल अंबानी समूहाचे रिलायन्स सेंटर हे मुख्यालय व अन्य मालमत्ता ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
येस बँकेकडून घेतलेल्या कजार्बाबत अनिल अंबानी यांची अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी १९ मार्च रोजी चौकशी केली होती. त्यावेळी येस बँकेकडून कायद्याचे पालन करूनच कर्ज घेण्यात आल्याचे अनिल अंबानी म्हणाले होते. कर्ज फेडण्यासाठी आम्ही पावलेही उचलली होती, असेही त्यांनी चौकशीत सांगितले होते.
सर्व हक्क बँकेकडे
अनिल अंबानी यांच्या उद्योगसमूहाच्या सर्व कंपन्यांचा कारभार सांताक्रूझ पूर्व येथील रिलायन्स सेंटर या मुख्यालयातूनच चालत होता. त्यामुळे ही वास्तू त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. या मालमत्तेच्या विक्री किंवा अन्य व्यवहारांसंदर्भातील सर्व हक्क यापुढील काळात येस बँकेकडे असतील. दक्षिण मुंबईतील नगिना महाल येथील दोन सदनिकांचे क्षेत्रफळ अनुक्रमे १,७१७ चौ. फूट व ४९३६ चौ. फूट आहे. बुडीत कर्जांच्या समस्येमुळे येस बँकही डबघाईला आली होती.