अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांच्याकडे हिंमत नाहीय; शिंदेंचे वकील जेठमलानींचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 07:15 PM2023-12-01T19:15:37+5:302023-12-01T19:17:30+5:30
ठाकरे गटाला निवडणूक आयोगातून दस्तावेज पाहिजे होते. आज सकाळी त्यांनी याचिका दाखल केली आणि मग पुन्हा याचिका मागे घेतली त्यामुळे विधानसभा अध्यक्षांचा वेळ वाया गेला - जेठमलानी
विधानसभेत शिंदे गटाच्या आमदारांवरील अपात्रतेच्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. यामध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रतोद सुनिल प्रभू यांची उलटतपासणी नोंदविण्याची कार्यवाही सुरु आहे. अशातच ईमेल आयडीवरून शिंदे गटाने ठाकरे गटाला कात्रीत पकडले आहे. तो शिंदेंचा मेल आयडीच नसल्याचा दावा शिंदे गटाचया वकिलांनी केला आहे. तसेच ठाकरे गटाने बोगस कागदपत्रे सादर केल्याचाही युक्तीवाद वकील जेठमलानी करत आहेत.
ठाकरे गटाला निवडणूक आयोगातून दस्तावेज पाहिजे होते. आज सकाळी त्यांनी याचिका दाखल केली आणि मग पुन्हा याचिका मागे घेतली त्यामुळे विधानसभा अध्यक्षांचा वेळ वाया गेला, त्यांचेच दस्तावेज आहेत तरी अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांच्याकडे हिंमत नाहीय ते सादर करण्याची. त्यांनी स्वतः याचिका दाखल केली पण ते साक्ष देत नाही. हे संपूर्ण दस्तावेज बोगस आहे, हे मी बोलणारच असा खुलासा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला.
आज विधानसभेत आमदार अपात्रतेच्या प्रकरणी व्हीपवरून उलटतपासणी झाली. त्यांनी सांगितले की, हा ईमेल आयडी नोंदवहीत आहे त्यामुळे आम्ही नोंदवही सादर केली. त्यांनी नोंदवही सादर केली ती ती 2023ची होती. आम्ही 2022ची नोंदवही सादर केली. 22 च्या नोंदवहीत एकनाथ शिंदे यांच्या नावासमोर हा ईमेल आयडी नाहीय. दुसरा ईमेल आयडी आहे, असा दावा जेठमलानी यांनी केला.
वाईट नीति आणि सत्ता हातात ठेवण्यासाठी हे सगळे केले गेलेय, सुनील प्रभू यांची आज साक्ष उलट तपासणी संपली असती. पण सकाळी जे दस्तावेज सादर केले त्यामुळे लांबणीवर पडले आहे, असा आरोप जेठमलानी यांनी केला आहे. ते दस्तावेज आणण्यासाठी त्यांना तीन वेळा संधी मिळाली होती. आमदार अपात्र प्रकरणात, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली तेव्हा आणि नंतर आमच्या बाजने रिजॉईनर झाला त्यावेळी देखील ते आणू शकत होते. महत्वाचे असूनही त्यांनी सादर केले नाहीत, असे जेठमलानी म्हणाले. शिवसेनेची जी शेवटची घटना आहे ती १९९९ ची आहे, असे निवडणूक आयोगानेच सांगितले आहे, असेही जेठमलानी यांनी स्पष्ट केले आहे.