Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना CBI ने घेतले ताब्यात, 100 कोटी वसुली प्रकरणात कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 02:33 PM2022-04-06T14:33:08+5:302022-04-06T14:33:15+5:30
Anil Deshmukh in CBI Custody: मंगळवारी अनिल देशमुख यांना जेजे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली, त्यानंतर आज सीबीआयने त्यांना मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले.
मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) 100 कोटी वसुली प्रकरणात ताब्यात घेतले आहे. यापूर्वी देशमुख यांनी विशेष न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने अनिल देशमुखांना मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले असून, त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
विशेष न्यायालयाच्या निर्णयानंतर भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयला अनिल देशमुख यांना ताब्यात घेण्याची परवानगी मिळाली. देशमुख यांनी सोमवारी अधिवक्ता अनिकेत निकम यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत सीबीआय कोठडीची मागणी करणाऱ्या याचिकेलाही आव्हान देण्यात आले होते.
Mumbai | CBI takes former Home Minister of Maharashtra, Anil Deshmukh in their custody from Arthur Road Jail where he is currently lodged. The central agency had lodged a case of extortion against him. He will be produced before CBI Court shortly.
— ANI (@ANI) April 6, 2022
(File photo) pic.twitter.com/MepfMLkykp
विशेष न्यायालयाने दिली परवानगी
विशेष न्यायालयाने 31 मार्च रोजी सीबीआयमार्फत दाखल केलेल्या अर्जाला परवानगी दिली होती. तसेच, एजन्सीने अनिल देशमुख यांच्यासह संजीव पालांडे, कुंदन शिंदे (अनिल देशमुख यांचे माजी सहकारी) आणि बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे ताब्यात घेण्याची परवानगी दिली होती. दरम्यान, काल म्हणजेच मंगळवारी अनिल देशमुख यांना जे.जे. रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. खांद्याची दुखापत झाल्यानंतर शनिवार (2 एप्रिल) रोजी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.
माजी आयुक्तांनी गंभीर आरोप केले होते
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून म्हटले होते की, 'अनिल देशमुख यांनी दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते. त्यासाठी त्यांनी सचिन वाझे यांना वसुली करण्यास सांगितले होते. या आरोपांनंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि नोव्हेंबरमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना अटक केली.