अनिल देशमुखांना जामीन मंजूर, पण काही मिनिटांतच स्थगिती, काय आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 07:49 AM2022-12-13T07:49:45+5:302022-12-13T07:50:09+5:30
सुप्रीम कोर्टात जाण्याचा सीबीआयचा निर्णय
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कथित भ्रष्टाचारप्रकरणी आरोपी असलेले राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांचा उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. मात्र, देशमुख यांना आणखी दहा दिवस कारागृहातच काढावे लागणार आहेत. कारण सीबीआयने या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी उच्च न्यायालयाकडे या आदेशावर स्थगिती मागितली. उच्च न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली.
अनिल देशमुख व सीबीआयचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. मकरंद कर्णिक यांच्या एकलपीठाने देशमुख यांची जामिनावर सुटका केली. देशमुख सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. गेल्या महिन्यात विशेष न्यायालयाने देशमुख यांची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला. देशमुख यांच्यावतीने ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी, ॲड. अनिकेत निकम यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला, तर सीबीआयतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात देशमुख यांना अटक केली. त्यानंतर काही महिन्यांनी सीबीआयने त्यांना अटक केली. गेल्या महिन्यात त्यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जामीन मंजूर करण्यात आला, तर सोमवारी उच्च न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणी त्यांचा एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. देशमुख यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आणि पोलिस नियुक्त्यांमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.