आर्थिक गैरव्यवहारात अनिल देशमुखच मुख्य सूत्रधार, ईडीची उच्च न्यायालयाला माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 06:40 AM2022-04-08T06:40:10+5:302022-04-08T06:40:53+5:30
Anil Deshmukh News: आर्थिक गैरव्यवहारामागे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचाच हात होता. या कटाचे तेच मुख्य सूत्रधार होते. संपत्ती जमविण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला, असा आरोप ईडीने उच्च न्यायालयात गुरुवारी केला.
मुंबई : आर्थिक गैरव्यवहारामागे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचाच हात होता. या कटाचे तेच मुख्य सूत्रधार होते. संपत्ती जमविण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला, असा आरोप ईडीने उच्च न्यायालयात गुरुवारी केला.
पोलीस अधिकाऱ्यांच्या अनुकूल बदल्या आणि नियुक्त्या करण्यासाठी देशमुख यांनी आपला प्रभाव वापरला, असाही आरोप तपास यंत्रणेने केला. देशमुख यांनी केलेला अर्ज फेटाळावा, अशी विनंती ईडीने प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला केली. देशमुखांची सुटका करण्यात आली तर ते तपासावर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे, असे ईडीने म्हटले आहे.
देशमुख यांना ईडीने २ नोव्हेंबर रोजी अटक केली. भ्रष्टाचार प्रकरणी सध्या ते सीबीआय कोठडीत आहेत. काही दिवसांपूर्वीच विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने देशमुख यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या अर्जावर ईडीने उत्तर दाखल केले. न्या. अनुजा प्रभूदेसाई यांच्या एकलपीठापुढे शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी आहे.
देशमुख यांनी केलेल्या याचिकेवर उत्तर देताना ईडीने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. ‘हृषिकेश देशमुख, सचिन वाझे, संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्याबरोबर आर्थिक गैरव्यवहाराच्या रचलेल्या कटाचे मुख्य सूत्रधार अनिल देशमुखच आहेत,’ असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
सार्वजनिक सेवेत असताना देशमुख यांनी खूप संपत्ती जमविली आणि त्यांच्या संपत्तीचे उत्पत्तीस्थान अस्पष्ट आहे. देशमुख तपासाला सहकार्य करत नाहीत.
संपत्तीचा स्रोतबाबत त्यांनी माहिती लपवली आहे. तसेच पोलिसांच्या बदल्या व बदल्यांच्या ठिकाणांबाबत अनधिकृत यादी दिली जात असल्याचे देशमुख यांनी मान्य केले आहे. या यादीबाबत कोणतीही नोंद नाही. अद्याप तपास सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. जर देशमुख यांची जामिनावर सुटका केली तर तपासात अडथळे निर्माण होतील आणि उघडकीस न आलेला गुन्हा अस्पष्टच राहील,’ अशी भीती ईडीने व्यक्त केली आहे.