मतदानासाठी अनिल देशमुख, नवाब मलिक हायकोर्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 07:03 AM2022-06-10T07:03:25+5:302022-06-10T07:03:51+5:30
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज देशमुख आणि मलिक यांच्या वतीने करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज नाकारला आहे.
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची मागणी विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मात्र, न्यायालयाने मागणी फेटाळल्याने देशमुख आणि मलिक यांनी मतदान करण्याची परवानगी मिळावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज देशमुख आणि मलिक यांच्या वतीने करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज नाकारला आहे. त्यामुळे देशमुख आणि मलिक यांना मतदानात सहभाग घेता येणार नाही. एकदा निवडून आलेल्या आमदाराला मतदानासाठीचा अधिकार अबाधित आहे, असा युक्तिवाद देशमुख आणि मलिक यांच्या वतीने करण्यात आला. परंतु देशमुख आणि मलिक यांच्या मागणीला इडीने विरोध दर्शविला. कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही, असा दावा इडीने न्यायालयात केला. त्यानुसार सत्र न्यायालयाने मलिकांच्या मागणीला नकार दर्शविला.
निर्णयाने निराशा - पाटील
नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाचा हक्क बजावता येईल, अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने निराशा झाली असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.