माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाचा दणका; कोठडीत 27 डिसेंबरपर्यंत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 06:49 PM2021-12-14T18:49:42+5:302021-12-14T18:50:23+5:30
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने अनिल देशमुखांनी कधीही पैशांची मागणी केली नाही, असा जबाब चांदिवाल आयोगासमोर नोंदवला आहे.
मुंबई: 100 कोटी खंडणी प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयाने त्यांच्या कोठडीमध्ये 27 डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. एकीकडे सचिन वाझेनेअनिल देशमुखांनी पैशांची मागणी केली नसल्याचा जबाब चांदिवाल आयोगासमोर दिला, पण त्यामुळे देशमुखांना अद्याप दिलासा मिळालेला नाही.
Rs 100 Crore extortion matter | The judicial custody of former Maharashtra Home Minister Anil Deshmukh extended till 27th December 2021. He is currently lodged in Arthur Road Jail in Mumbai. pic.twitter.com/SKt2rQ6UBn
— ANI (@ANI) December 14, 2021
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवले होते. त्या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर सचिन वाझेमार्फत 100 कोटींची खंडणी जमा करायला सांगितल्याचा आरोप केला होता. पण, आज या खंडणी प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने अनिल देशमुख यांना क्लीन चीट देत देशमुखांनी कधीही पैशांची मागणी केली नाही, असा जबाब चांदिवाल आयोगासमोर नोंदवला आहे. हा जबाब म्हणजे,अनिल देशमुखांना क्लीनचीट असल्याचे म्हटले जात होते, पण अद्याप न्यायालयाने त्यांना दिलासा दिलाच नाही.
पैशांची मागणी कधीच केली नाही
चांदिवाल आयोगासमोर अनिल देशमुखांचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी वाझेची उलट तपासणी केली असता अनिल देशमुख अथवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्याकडून पैशांची मागणी करण्यात आली नव्हती असे वाझेने म्हटले. त्याशिवाय आपण कोणत्याही बार मालकाकडून अथवा त्यांच्याशी संबंधितांकडून पैसे घेतले नाही असेही वाझेने आपल्या जबाबात म्हटले आहे. आता चांदिवाल आयोगाने पुढील सुनावणी 21 डिसेंबर रोजी ठेवली आहे.
निलंबनाच्या काळातही मी तपास कार्य करायचो
यावेळी वाझेने निलंबनाच्या काळात मुंबई पोलीस मुख्यालयाशी संलग्न असल्याची माहिती दिली. सेवेत नसतानाही अनेक प्रकारच्या तपासात माझी मदत घेतली जात होती. घटनास्थळाचे पंचनामे करणे, संबंधितांचे जबाब नोंदविणे, साक्षीदार, संशयित यांचा तपास करणे ही कामे मी करीत असे. पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या वेळी रायगड पोलिसांनी माझी मदत घेतली होती. तसे मी मुंबई सहपोलीस आयुक्तांच्या निर्देशांवरून केले होते, असेही वाझेने स्पष्ट केले होते.