अनिल देशमुख म्हणतात बदल्यांची यादी अनिल परब द्यायचे, अँटिलिया प्रकरणात परमबीर सिंह हेच मास्टरमाइंड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 07:24 AM2022-02-03T07:24:18+5:302022-02-03T07:25:29+5:30
Anil Deshmukh News: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे मनसुख हिरेन आणि उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचे मास्टरमाइंड आहेत. परमबीर यांनी आपल्याला चुकीची माहिती दिली असून अनेक गोष्टी लपवल्या असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे मनसुख हिरेन आणि उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचे मास्टरमाइंड आहेत. परमबीर यांनी आपल्याला चुकीची माहिती दिली असून अनेक गोष्टी लपवल्या असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
परमबीर सिंह यांना विधानभवन आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलावले त्यावेळी परमबीर यांनी योग्य माहिती दिली नसल्याचेही अनिल देशमुख यांनी सांगितले. त्यानुसार, मुख्यमंत्र्यांनी आणि मी गृहमंत्री असताना लगेचच परमबीर यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेऊन त्यांना डीजी होमगार्डकडे पाठवले. परमबीर यांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे, चुकीचे आहेत. तसेच, परमबीर हेच वाझेंना वसुलीचे काम देत असल्याचा दावाही त्यांनी ईडीला दिलेल्या जबाबात केला आहे.
त्याच वेळी राज्यातील पोलीस बदल्यांची यादी परिवहन मंत्री अनिल परब आपल्याकडे देत असल्याचाही गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी ईडीकडे केला आहे. कदाचित परब यांना शिवसेनेच्या आमदारांकडून ही यादी मिळायची आणि ते माझ्याकडे द्यायचे, पुढे तीच यादी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली होती असे अनिल देशमुख यांनी जबाबात नमूद केले आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात त्यांच्या या जबाबाचा समावेश आहे. देशमुख यांच्या या नव्या आरोपांमुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशमुख यांनी ईडीला दिलेल्या जबाबात, अनिल परब यांनी दिलेली यादीच अतिरिक्त मुख्य सचिवांनी दिली होती. त्यानेळी मी सांगितले होते की, जर बदल्या नियमात बसत असेल तर ही प्रक्रिया करा अन्यथा प्रक्रिया करू नका असे सांगितल्याचे जबाबात नमूद आहे.
परबही द्यायचे बदल्यांची यादी
परमबीर यांनी दिलेल्या जबाबात, वारंवार सह्याद्री गेस्ट हाऊसला बोलावून अनिल देशमुख आणि मंत्री अनिल परब यांच्याकडून पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात यादी दाखवली जायची. मुंबईतल्या बदल्यांमध्ये अनिल परब आणि अनिल देशमुख यांचा हस्तक्षेप होता. जुलै २०२० मध्ये मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांची ऑर्डर काढण्यात आली होती. ती सीताराम कुंटे यांनी व्हॉट्सॲप संदेश पाठवून मागे घ्यायला लावली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो आदेश मागे घ्यायला लावला होता, असा दावाही परमबीर सिंह यांनी केला आहे.