अनिल देशमुख यांचा राजीनामा; वळसे-पाटील राज्याचे नवे गृहमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 04:26 AM2021-04-06T04:26:43+5:302021-04-06T07:28:21+5:30

परमबीर सिंग यांच्या आरोपांप्रकरणी हायकोर्टाने दिले सीबीआय चौकशीचे आदेश

Anil Deshmukh steps down, Dilip Walse Patil to be new home minister | अनिल देशमुख यांचा राजीनामा; वळसे-पाटील राज्याचे नवे गृहमंत्री

अनिल देशमुख यांचा राजीनामा; वळसे-पाटील राज्याचे नवे गृहमंत्री

googlenewsNext

मुंबई : ज्येष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर देशमुख यांनी सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या शिफारसीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे देशमुख यांचा राजीनामा मंजूर केला असून गृह विभागाचा कार्यभार  मंत्री, कामगार व राज्य उत्पादन शुल्क दिलीप वळसे पाटील यांचेकडे  देण्यास मंजूरी दिली आहे.

उच्च न्यायालयाचा निकाल येताच अनिल देशमुख हे पवार यांच्या येथील सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल झाले. पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील बोलावून घेतले. तिघांमध्ये पाऊणतास चर्चा झाली. यावेळी देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली. शरद पवार यांनीही त्यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला. त्यानंतर देशमुख यांच्या राजीनाम्याचे पत्र तयार करण्यात आले. ते घेऊन ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गेले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनाम्याचे पत्र दिले व नंतर ट्विट करून राजीनाम्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकारांना सांगितले की, देशमुख यांनी स्वत:च शरद पवार यांना भेटून राजीनाम्याची तयारी दर्शविली. त्याला पवार यांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटून देशमुख यांनी राजीनामा सोपविला.

प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ स्फोटके ठेवल्याची घटना, त्यानंतर मनसुख हिरेनची हत्या, तपास अधिकारी सचिन वाझे हाच या हत्येत मुख्य आरोपी म्हणून समोर येणे असा धक्कादायक घटनाक्रम सुरू असताना मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांना हटविण्यात आल्यानंतर त्यांनी लेटर बॉम्ब टाकला. सचिन वाझेला बार, रेस्टॉरन्ट आणि हुक्का पार्लर्समधून दर महिन्याला मुंबईतून १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट देशमुख यांनी दिले होते, असा आरोप करणारे पत्र परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २० मार्चला लिहिले. त्यातून देशमुख यांच्या अडचणीत वाढ होत गेली. या प्रकरणी सीबीआयने चौकशी करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर नैतिकतेच्या आधारे देशमुख यांनी राजीनामा दिला.

काय आहे राजीनामापत्रात?
मा.ना. श्री. उद्धव ठाकरेसाहेब,
मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेत आज दि. ५ एप्रिल रोजी पारित केलेल्या आदेशान्वये अर्जावर सीबीआयमार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केले आहेत. त्यानुसार मी गृहमंत्री पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या उचित वाटत नाही. म्हणून मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे. मला मंत्री (गृह) पदावरून कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती.
आपला नम्र,
अनिल देशमुख

अनिल देशमुख दिल्लीत 
उच्च न्यायालयाच्या सोमवारच्या आदेशाला अनिल देशमुख हे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. त्यासाठी ते सोमवारीच दिल्लीला रवाना झाले. मंगळवारी ते याचिका दाखल करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात त्यांनी ॲड. राहुल चिटणीस यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांच्याशी सुमारे पाऊण तास चर्चा केली आहे. 

नवे गृहमंत्री
अभ्यासू आणि नम्र लोकप्रतिनिधी अशी ओळख असलेले दिलीप वळसे पाटील हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदारसंघाचे सातव्यांदा आमदार आहेत. याआधी त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, ऊर्जामंत्रिपद तसेच विधानसभेचे अध्यक्षपद सांभाळले आहे. 

न्यायालयाने नोंदविलेली निरीक्षणे
परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे नागरिकांचा राज्य पोलिसांवरचा विश्वास धोक्यात आला आहे.
सेवेत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने गृहमंत्र्यांवर केलेल्या या आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सकृतदर्शनी गुन्हा दाखल करून घेण्यासारखे प्रकरण असेल, तर त्याचा तपास करावा लागेल. 
राज्यघटना कायद्याच्या राज्याचे समर्थन करते, राजकीय पाठबळ असलेल्या गुंडांच्या शासनाचे नाही.

आधी संजय राठोड,आणि आता देशमुख
महाविकास आघाडी सरकारमध्ये आधी संजय राठोड आणि आता अनिल देशमुख या दोन कॅबिनेट मंत्र्यांनी राजीनामा दिला. संजय राठोड यांना पूजा चव्हाण हिच्या  आत्महत्या प्रकरणात घरी जावे लागले होते.

न्यायालयाच्या निकालानंतर काय झाले?
अनिल देशमुख हे पवार यांच्या येथील सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल. उपमुख्यमंत्री अजित पवार हेही तिथे आले. तिघांमध्ये पाऊणतास चर्चा झाली. 
देशमुख यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली, 
शरद पवार यांनी तसाच सल्ला दिला. देशमुख यांनी राजीनाम्याचे पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटून दिले. 
मुख्यमंत्र्यांनी त्यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना शिफारस केली. कोश्यारी यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा मंजूर केला. गृह विभागाचा कार्यभार वळसे पाटील यांचेकडे देण्यास मंजूरी दिली.

अनिल देशमुख यांच्यापुढे राजीनाम्याशिवाय पर्यायच नव्हता. नैतिकताच होती तर त्यांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता. या प्रकरणातील काही हँडलर्ससह धक्कादायक माहिती समोर येईल
देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते 

Web Title: Anil Deshmukh steps down, Dilip Walse Patil to be new home minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.