अनिल देशमुख पीएमार्फत पैसे घ्यायचे, वाझे यांचा गौप्यस्फोट; ही तर फडणवीस यांची नवीन चाल, देशमुख यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 06:03 AM2024-08-04T06:03:55+5:302024-08-04T06:05:38+5:30
‘अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, याचे सर्व पुरावे सीबीआयकडे आहेत,’ असा गंभीर आरोप वाझे याने शनिवारी केला.
मुंबई/नागपूर : मनसुख हिरेन खून प्रकरणातील आरोपी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याने अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, याचे सर्व पुरावे सीबीआयकडे आहेत,’ असा गंभीर आरोप वाझे याने शनिवारी केला.
२०२१ च्या अँटिलिया बॉम्ब प्रकरण तसेच मनसुख हिरेन खून प्रकरणात वाझे गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात आहे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले असता एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना वाझेने सांगितले की, ‘मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये जयंत पाटील यांचेही नाव आहे. हे सर्व प्रकरण देशमुख यांच्या विरोधात गेलेले आहे. तसेच मी या प्रकरणात नार्को टेस्ट करायलाही तयार आहे.’
वाझेच्या वक्तव्यावर विश्वास कसा ठेवणार? : सचिन वाझेने केलेले वक्तव्य म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची ही नवीन चाल आहे, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. आपण काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे आता वाझेमार्फत माझ्यावर आरोप केले जात आहेत. परंतु वाझे गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्याच्या कोणत्याही वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
जे समोर येईल त्याची चौकशी : फडणवीस : ‘सचिन वाझे यांनी मला पत्र पाठविल्याची बातमी मला प्रसारमाध्यमांमधून समजली. अजून मी ते काहीही पाहिलेले नाही. मी गेल्या दोन दिवसांपासून नागपुरात आहे. सगळे पाहिल्यानंतर मी त्यावर प्रतिक्रिया देईन; पण जे समोर येईल त्यावर आम्ही योग्य ती चौकशी करू,’ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात दिली.