अनिल देशमुखांचा मुलगा सलीलचे फाऊंडेशनही ‘आयकर’च्या रडारवर; ४८ तासांपासून सुरू आहे कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 12:08 PM2021-09-19T12:08:23+5:302021-09-19T12:09:49+5:30
देशमुख यांच्यावरील आयकर विभागाची कारवाई शनिवारी रात्रीपर्यंत सुरू होती. शुक्रवारी पथकाने विविध ठिकाणांवर धाड टाकली होती. ४८ तासांपासून विभागाचे पथक सूक्ष्मपणे दस्तावेज तपासत आहेत.
नागपूर : आयकर विभागाच्या पथकाने शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित संस्थांची चौकशी केली. सूत्रांनुसार, देशमुख यांचे पुत्र सलील यांचे कोशिश फाऊंडेशनसुद्धा चौकशीच्या घेऱ्यात आले आहे. आयकर विभागाच्या पथकाने फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची विचारपूस केली.
देशमुख यांच्यावरील आयकर विभागाची कारवाई शनिवारी रात्रीपर्यंत सुरू होती. शुक्रवारी पथकाने विविध ठिकाणांवर धाड टाकली होती. ४८ तासांपासून विभागाचे पथक सूक्ष्मपणे दस्तावेज तपासत आहेत. विभागाकडून अजूनपर्यंत अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार सीए किशोर देवानी यांच्या घरी व कार्यालयात विभागाचे पथक पोहोचले होते. देशमुख यांच्याशी संबंधित शंकरनगर येथील रचना गॅलेक्सी अपार्टमेंट येथील फ्लॅटची तपासणी करण्यात आली. शनिवारी मिडास हाईट्स, रामदासपेठ येथील देशमुख यांच्या श्री साई शिक्षण संस्थेच्या कार्यालयात विभागाने कारवाई केली. फेटरी येथील नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजीसोबतच देशमुख यांच्या सिव्हील लाईन्स व काटोल येथील निवासस्थानीसुद्धा पथकाने तपासणी केली.
शैक्षणिक संस्थेच्या दानाचीही चौकशी
- सूत्रानुसार, देशमुख यांच्या शैक्षणिक संस्थेला मिळालेल्या ४.१८ कोटी रुपयांच्या दानाचीही चौकशी केली जात आहे. हे पैसे दिल्ली येथील चार कंपन्यांनी श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यात जमा केले होते.
- तर १०० कोटी रुपये वसुली प्रकरणात तपास यंत्रणा आणखी सक्रिय झाल्या आहेत. देशमुख यांच्याविरुद्ध ईडीद्वारा लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.