अनिल कपूर स्टंट प्रकरण : प्रॉडक्शन कंपनीला पश्चिम रेल्वेची नोटीस
By admin | Published: July 16, 2016 03:25 AM2016-07-16T03:25:19+5:302016-07-16T03:25:19+5:30
लोकलच्या दरवाजात उभे राहून स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या आदेशानुसार आरपीएफकडून (रेल्वे सुरक्षा दल)कारवाई केली जात आहे
मुंबई : लोकलच्या दरवाजात उभे राहून स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या आदेशानुसार आरपीएफकडून (रेल्वे सुरक्षा दल)कारवाई केली जात आहे. ही कारवाई होत असतानाच एका मालिकेच्या प्रमोशनसाठी लोकलच्या दरवाजाच्या ‘पायदाना’वर उभे राहून अभिनेता अनिल कपूर याने गुरुवारीलटकत प्रवास करत रेल्वेच्या नियमांचा भंग केल्याचे समोर आले. त्यानंतर जाग आलेल्या पश्चिम रेल्वे प्रशासनाने तात्काळ मालिकेच्या प्रॉडक्शन कंपनीकडून स्पष्टीकरण मागितले. प्रॉडक्शन हाऊसला सात दिवसांत उत्तर देण्याची मुदत देण्यात आली आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या आदेशानुसार १६ जूनपासून दोन टप्प्यात अनधिकृत तिकिट विक्री, महिला डब्यांत पुरुषांची होणारी घुसखोरी, अनधिकृत फेरीवाले आणि लोकलच्या दरवाजाच्या पायदानावर उभे राहून स्टंट करणाऱ्यांविरोधात आरपीएफकडून विशेष मोहिम घेण्यात आली आहे.
अनिल कपूरच्या अशा वर्तनाने आणखी प्रोत्साहन लोकांना मिळू शकते, असे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)