Sharad Pawar: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला? अनिल परबांनी घेतली शरद पवारांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 10:41 AM2021-11-13T10:41:21+5:302021-11-13T10:41:58+5:30
Anil Parab met Sharad Pawar: आझाद मैदानावरील आंदोलनात शेकडो एसटी कर्मचारी सहभागी झाले होते. शुक्रवारी आझाद मैदानावरील आंदोलक कामगारांची संख्या शुक्रवारी निम्म्याने कमी झाल्याचे पाहावयास मिळाले.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवरून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात फूट पडल्याचे चित्र शुक्रवारी निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे आज सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची राज्याचे परिवाहन मंत्री अनिल परब (Anil Parab ) यांनी भेट घेत संपावर चर्चा केली आहे.
एसटी कर्मचारी हळूहळू कामावर परतू लागले आहेत. शुक्रवारी १७ आगारांमधून ३६ बसगाड्या सोडण्यात आल्या व त्यातून ८२६ प्रवाशांनी प्रवास केल्याचा दावा एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी केला, तर दुसराकडे आझाद मैदानावरील आंदोलन स्थळावरील आंदोलक कर्मचाऱ्यांची संख्याही रोडावल्याचे दिसले. जवळपास दीड हजार कर्मचारी परतले आहेत.
शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकवर अनिल परब गेले होते. त्यांच्यात 10 मिनिटे चर्चा झाली. या बैठकीत ST कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत महत्वाची चर्चा झाल्याचे समजते. या संपावर समन्वयाने सुवर्णमध्य कसा काढता येईल यावर चर्चा झाल्याचे समजते.
आझाद मैदानावरील आंदोलनात शेकडो एसटी कर्मचारी सहभागी झाले होते. शुक्रवारी आझाद मैदानावरील आंदोलक कामगारांची संख्या शुक्रवारी निम्म्याने कमी झाल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे संपात फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसगाड्या बंद असल्याचा मोठा फटका राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसला आहे. शाळेत जाण्यासाठी त्यांना वाहने उपलब्ध नाहीत. रेल्वेच्याही मर्यादित गाड्या सुरू आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. शिवाय परीक्षांपासूनही त्यांना वंचित राहण्याची वेळ आली आहे.