नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक अनिल परबांनी लक्षात आणून दिली; म्हणाल्या, "मी अनावधानाने..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 03:56 PM2024-07-08T15:56:58+5:302024-07-08T15:57:45+5:30

आज विधान परिषदेत ठाकरे गटाचे नवनिर्चित आमदार अनिल परब आणि नीलम गोऱ्हे यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

Anil Parab reminded Neelam Gorhe of 'that' mistake; Said, "I unintentionally...", Vidhan Parishad | नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक अनिल परबांनी लक्षात आणून दिली; म्हणाल्या, "मी अनावधानाने..."

नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक अनिल परबांनी लक्षात आणून दिली; म्हणाल्या, "मी अनावधानाने..."

मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान विरोधकांमध्ये आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यात काही-ना-काही शा‍ब्दिक संघर्ष होताना दिसून येत आहे. तसेच, उपसभापती नीलम गोऱ्हे विरोधकांना बोलून देत नाहीत, असा आरोप केला जातो. आज विधान परिषदेत ठाकरे गटाचे नवनिर्चित आमदार अनिल परब आणि नीलम गोऱ्हे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. नीलम गोऱ्हे यांना अनिल परब यांनी चूक लक्षात आणून दिली. त्यावर नाराजीही व्यक्त केली. त्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी मी अनावधानाने बोलून गेल्याचे म्हटले आहे.

मुंबईत रात्री उशिरापासून जोरदार पावसाची हजेरी आहे. अनेक मंत्री, आमदार यांना अधिवेशनात पोहोचता आले नाही. त्यामुळे आज विधान परिषदेत आणि विधानसभेतलं कामकाज रोजच्या प्रमाणे चालले नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज उद्या सकाळी ११ पर्यंत तहकूब केलं आहे. तर दुसरीकडे विधान परिषद सभागृहात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या एका वक्तव्याविषयी अनिल परब यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच हे वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याची विनंतीही अनिल परब यांनी केली. 

अनिल परब म्हणाले, "उपसभापतींनी आमच्याबाबत आक्षेप नोंदवला आहे. उपसभापती दोन दिवसांपूर्वी म्हणाल्या की तुम्ही सभागृहात गोंधळ घालता कारण तुम्हाला उद्धव ठाकरेंना तुम्ही काय काम करता हे दाखवायचं असतं. मग आता मी तुम्हाला असं म्हणू का, तुम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना तुम्ही किती काम करताय हे दाखवायचं असत म्हणून आम्हाला बोलू देत नाही. तुम्हाला किती राग येईल ते सांगा?", असा सवाल अनिल परब यांनी विचारला. पुढे अनिल परब म्हणाले, "मी काम करतो, हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे. म्हणूनच त्यांनी मला चारवेळा आमदार केलं आहे. हेच तुमच्याबाबत बोललो तर तु्म्हाला राग येईल. माझ्याबाबत तुम्ही जे वक्तव्य केलं ते वक्तव्य सभागृहाच्या कामकाजातून काढून टाका."

यावर उपसभापती नीलम गोऱ्हे या सामोपचाराची भूमिका करताना दिसून आल्या. त्या म्हणाल्या, "मी तुमच्याविषयी अनावधानाने काही बोलून गेले असेन. मी तसं काही बोलले आहे का हे तपासून काढून टाकते", असे म्हणत नीलम गोऱ्हे यांनी अनिल परब यांना ते वक्तव्य काढून टाकण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, अनिल परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून आले आहेत. त्यांनी भाजपच्या किरण शेलार यांचा पराभव केला आहे. आज त्यांच्या या वक्तव्यामुळे विधान परिषदेतलं कामकाज चर्चेत राहिलं.
 

Web Title: Anil Parab reminded Neelam Gorhe of 'that' mistake; Said, "I unintentionally...", Vidhan Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.