“आम्ही जनतेलाही बांधील, सरकार गप्प बसणार नाही”; अनिल परबांचा ST संपकऱ्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 07:23 PM2021-12-16T19:23:23+5:302021-12-16T19:24:30+5:30

एसटी संपाबाबत अद्यापही तोडगा निघालेला नसून, सरकार आणि कर्मचारी आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत.

anil parab warns again govt will take action regarding st workers strike | “आम्ही जनतेलाही बांधील, सरकार गप्प बसणार नाही”; अनिल परबांचा ST संपकऱ्यांना इशारा

“आम्ही जनतेलाही बांधील, सरकार गप्प बसणार नाही”; अनिल परबांचा ST संपकऱ्यांना इशारा

Next

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ST कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्याप पूर्णपणे तोडगा निघालेला नाही. काही भागातील एसटी सेवा सुरू झाली असली तरी बऱ्याच ठिकाणची एसटीची सेवा ठप्प आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतावे, यासाठी सरकारकडून अनेकदा आवाहन करण्यात आले आहे. मात्र, एसटी महामंडळाच्या विलिनीकरणावर कर्मचारी ठाम आहेत. यातच राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी पुन्हा एकदा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. आम्ही जनतेलाही बांधील आहोत. आता सरकार हातावर हात ठेवून गप्प बसणार नाही, असे अनिल परब यांनी म्हटले आहे. 

सरकार हातावर हात ठेवून गप्प बसणार नाही. मेस्मा लावण्याबाबत बैठकीनंतर निर्णय होऊ शकतो. तसेच, याबाबत वेगवेगळ्या पर्यायांवर विचार सुरू असून आमचे दायित्व जसे कर्मचाऱ्यांशी तसे ते जनतेशीदेखील आहे, असे अनिल परब यांनी म्हटले आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली जातेय

एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. आतापर्यंत सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. संपामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे. सदावर्ते यांचे काही नुकसान होत नाही, अशी टीका अनिल परब यांनी केली आहे. किरीट सोमय्या करत असलेल्या टीकेबाबत बोलताना अनिल परब म्हणाले की, किरीट सोमय्यांना उत्तर देण्यास बाधिल नसून, संबंधित यंत्रणांना दिले आहे. सोमय्यांनी मुख्यमंत्री, महाविकास आघाडी आणि माझी बदनामी करण्याचा धंदा सुरू केला आहे. याबाबत कोर्टात दावा दाखल केला आहे. त्यांमुळे किरीट सोमय्यांना माफी तरी मागावी लागेल किंवा १०० कोटी तरी द्यावे लागतील, असे अनिल परब यांनी सांगितले. 

दरम्यान, महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार ओबीसींवर अन्याय होऊ देणार नसून कॅबिनेटमध्ये निवडणुका पुढे ढकलण्याबाबत निर्णय घेण्यात झाल्याचे अनिल परब यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: anil parab warns again govt will take action regarding st workers strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.