अनिल देशमुखांनंतर पुढचा नंबर अनिल परबांचा?; मध्यरात्रीच्या 'त्या' दोन ट्विटमुळे खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 07:41 AM2021-11-02T07:41:11+5:302021-11-02T07:52:57+5:30
महाविकास आघाडीला मोठा धक्का; माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना १३ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक
मुंबई: १०० कोटींच्या वसुली प्रकरणी आरोप असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh Arrest) यांना तब्बल १३ तासांच्या दीर्घ चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) अखेर अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले अनिल देशमुख सोमवारी सकाळी ईडीसमोर हजर झाले. सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली.
आता अनिल देशमुख यांच्यानंतर पुढचा नंबर अनिल परब (Anil Parab) यांचा असेल, असा दावा भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांनी केला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) यासंदर्भात मध्यरात्री ट्विट केली आहेत. 'अखेर ठाकरे सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. १०० कोटींहून अधिक गैर-पारदर्शक व्यवहार. अनिल देशमुख नंतर अनिल परब,' असं सोमय्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास त्यांनी हे ट्विट केलं आहे.
At last Home Minister #AnilDeshmukh is arrested by ED. More than ₹100 Crores Non Transparent Transactions. Cash Trail
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 1, 2021
Next will be #AnilParab
अखेर ठाकरे सरकारचे गृहमंत्री #अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. ₹100 कोटींहून अधिक गैर-पारदर्शक व्यवहार.
अनिल देशमुख नंतर अनिल परब pic.twitter.com/SN2Tek9Q7n
भाजप आमदार नितेश राणेंनीदेखील मध्यरात्री २ च्या सुमारास असंच एक ट्विट केलं. 'अनिल देशमुख... हॅप्पी दिवाली! अनिल परब.. मेरी ख्रिसमस??,' असं सूचक ट्विट राणेंनी केलं आहे. 'नवाब मलिक आणि संजय राऊतांचे विशेष आभार', असंही राणेंनी त्यांच्या ट्विटमध्ये खोचकपणे नमूद केलं आहे. देशमुख यांच्या अटकेनंतर अवघ्या काही मिनिटांनंतर राणे आणि सोमय्या यांनी ट्विट केली आहेत.
Anil deshmukh.. Happy Diwali!
— nitesh rane (@NiteshNRane) November 1, 2021
Anil Parab..Merry Christmas??
Special thanks to nawab malik n Sanjay raut 😅
अनिल परब यांच्यावर काय आरोप?
परिवहन मंत्री अनिल परब यांनी बजरंग खरमाटे या अधिकाऱ्याच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांना ईडीनं समन्स बजावून चौकशीसाठी बोलावलं होतं. 'ईडीच्या अधिकाऱ्यांकडे खरमाटे यांच्या ७५० कोटी रुपयांच्या बेनामी मालमत्तेची माहिती आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांचेही काऊंटडाऊन सुरू झालेलं आहे, असं विधान सोमय्यांनी दीड महिन्यांपूर्वी केलं होतं.