पिंपरीत उभारणार प्राणी संगोपन केंद्र
By admin | Published: July 15, 2017 01:40 AM2017-07-15T01:40:48+5:302017-07-15T01:40:48+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे मोकाट प्राण्यांचा सांभाळ करण्यासाठी प्राणी संगोपन केंद्र उभारण्यात येणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे मोकाट प्राण्यांचा सांभाळ करण्यासाठी प्राणी संगोपन केंद्र उभारण्यात येणार असून यासाठी पुणे जिल्हा नियोजन समितीने ३५ लाखांचा निधी दिला आहे. त्यामुळे लवकरच पालिकेतर्फे गाय वगळता अन्य पाळीव प्राण्यांचे संगोपण केंद्र शहरात उभारणार आहे.
शहरात शासनाचे एकही प्राणी संगोपन केंद्र नाही. त्यामुळे परिसरातील मोकाट जनावरांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. महापालिकेतर्फे अशा प्रकारचे केंद्र असावे, अशी मागणी विविध प्राणी प्रेमी संस्थांची होती. मात्र, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची उपलब्धता करून कोणी द्यायची, असा प्रश्न होता. त्यामुळे प्राणी संगोपन केंद्र केवळ चर्चेचाच विषय बनला होता.
पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे उपस्थित होते. या बैठकीविषयीची माहिती महापौर नितीन काळजे यांनी आज दिली़
ते म्हणाले, ‘पालकमंत्र्याच्या बैठकीत प्राणी संगोपण करण्याची शासनाची योजना आहे. त्या अंतर्गत २६ एप्रिल रोजी पालिकेला पस्तीस लाख रुपयांचा निधी दिला आहे. या बैठकीत विविध विकासकामाचा आढावा घेण्यात आला.’’
महापालिकेकडून जागेचा शोध
महापालिका परिसरात संगोपन केंद्रासाठी सव्वा एकर जागेची आवश्यकता आहे. एमआयडीसीची मोकळी जागा, गायरान किंवा पिंपरी-चिंचवड पालिकेच्या मालकीच्या जागेत हे केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी नियोजन समितीकडून पस्तीस लाखांचा निधी मिळाला असून पायाभूत सुविधांसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. सप्टेंबर २०१७ च्या अगोदर केंद्राचे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संगोपन केंद्रात कुत्रा, मांजर, घोडा तसेच अपघातात जखमी झालेले पक्षी सांभाळण्यात येणार आहेत, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांनी सांगितले.