मराठवाड्यात जनावरांचा बाजार उठला
By admin | Published: July 17, 2015 12:11 AM2015-07-17T00:11:58+5:302015-07-17T00:11:58+5:30
तीन वर्षांपासून दुष्काळ पाठ सोडत नसल्याने यंदा तर पोट भरणेही मुश्कील होत आहे. अशा वेळी दावणीला जनावरे ठेऊन त्यांना उपाशी कोण मारणार? याच विचाराने
औरंगाबाद : तीन वर्षांपासून दुष्काळ पाठ सोडत नसल्याने यंदा तर पोट भरणेही मुश्कील होत आहे. अशा वेळी दावणीला जनावरे ठेऊन त्यांना उपाशी कोण मारणार? याच विचाराने मराठवाड्यातील शेतकऱ्यांची दावण रिकामी होत असतानाच किमती निम्म्यावर आल्याने शेतकऱ्यांना आपले पशूधन बेभाव विकावे लागत आहे.
मनुष्याला पिण्याला पाणी आणि खायला अन्न मिळणे कठीण झाले असताना जनावरांना कोण सांभाळेल? म्हणूनच औरंगाबादेतील छावणीत गुरुवारी भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात जनावरांची मोठी गर्दी दिसली. मात्र, खरेदीदार भेटेना, जे आहेत ते कमी भावाने मागू लागले.
बैल विकावे का विकू नये, या संभ्रमात असलेले जनार्दन नावकर मोठ्या खरेदीदारांची प्रतीक्षा करीत बसले होते. जालना जिल्ह्यातील घाटी शिरसगाव येथील नावकर यांनी बैलजोडी विक्रीला आणली होती. मागील वर्षी ४५ हजार रुपयांमध्ये खरेदी केलेली ही जोडी आता त्यांना सांभाळणे कठीण जात आहे. नावकर म्हणाले की, सकाळी ८ पासून बाजारात आलो. आता सायंकाळ झाली. पण एवढ्या वेळात २ ग्राहक आले; पण त्यांनी ३० हजारांत बैल मागितल्याने सौदा झाला नाही.
औरंगाबाद जिल्ह्यातील वडोदबाजारमध्येही असेच चित्र आहे. या बाजारात हजारो जनावरे विक्रीस येत आहेत. यात बैलांची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे पेरणीच्या वेळी ज्या बैलजोडीची किंमत ८० ते ९० हजार होती, त्याच बैलजोडीची किंमत आता ४० ते ५० हजारांवर आली आहे. उस्मानाबाद येथील सुनील मोरे यांनी काही महिन्यांपूर्वी खरेदी केलेली ५१ हजार रुपयांची बैलजोडी चाऱ्याअभावी विक्रीस काढली. मात्र व्यापाऱ्यांनी केवळ २० हजारांत मागितल्याचे त्यांनी सांगितले. जालना जिल्ह्यातील पारडगाव येथील जनावरांच्या बाजारावर दुष्काळाची गडद छाया आहे. गतवर्षी येथे १ कोटींची उलाढाल झाली होती. यंदा हे प्रमाण ३ लाखांवर असल्याचे ठेकेदारांनी सांगितले. (लोकमत चमू)
- लातूर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या उदगीर तालुक्यातील हाळी- हंडरगुळीच्या बाजारात विक्रीसाठीच्या पशुधनाची संख्या वाढली आहे, तर पशुधन कसे जगवायचे या भीतीने खरेदीदारांची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे़
- ७० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून सुरू असलेल्या येथील जनावरांच्या बाजारास आजही महत्त्व आहे़ येथील बाजारात देवणी, लाल कंधारी, संकरित, गावरान आदी जातींची जनावरे मिळतात़ गेल्या तीन वर्षांपासून अल्प पर्जन्यमान होत असल्याने पशुपालक आणि शेतकऱ्यांसमोर पशुधन जगवायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे़
- दरवर्षी येथे आॅक्टोबर ते मार्च या कालावधीत पशुधनाचा मोठा बाजार भरतो़ पण यंदा जून-जुलैमध्येही तितकाच बाजार भरत आहे़ पशुधनाच्या विक्रीची संख्या वाढली असली तरी आठवड्याला ३०च्या जवळपास जनावरांची खरेदी- विक्री होत असल्याचे ग्रामपंचायतीचे लिपिक संभाजी निटुरे यांनी सांगितले़