हायटेक चारा छावणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अवघ्या आठ दिवसात बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 04:24 PM2019-06-20T16:24:25+5:302019-06-20T17:22:44+5:30
चांगला पाऊस पडेपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांनी आपली जनावरे चारा छावणीतून घेऊन जाऊ नयेत असे आव्हान ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हायटेक छावणी समजल्या जाणाऱ्या लासूरच्या येथील चारा छावणीच्या भेटीवेळी केले होते.
मोसिन शेख
औरंगाबाद - दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्यासाठी गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. तिथे जनावरांची काय सोय होणार अशी स्थिती आहे. या स्थितीतही अनेक ठिकाणी चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. मात्र सरकारच्या उदासीन धोरणामुळे या चारा छावण्या बंद पडत आहेत. गेल्याच आठवड्यात महाराष्ट्रातील हायटेक छावणी म्हणून गौरविण्यात आलेली आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिलेली चारा छावणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आठ दिवसांतच बंद पडली आहे. त्यामुळे सहा हजारहून अधिक जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मराठवाडा म्हणजे १२ महिने दुष्काळ, परंतु आता पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणातून मागच्या आठवड्यात ही घोषणा केली होती. मात्र, अवघ्या आठ दिवसात पुन्हा फडणवीस यांना याच घोषणेची आठवण करून देण्याची वेळ आली आहे. कारण त्यांनी ज्या ठिकाणी आपल्या घोषणांचा पाऊस पाडला, त्याच ठिकाणी ६ हजारपेक्षा अधिक जनावरांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
चांगला पाऊस पडेपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांनी आपली जनावरे चारा छावणीतून घेऊन जाऊ नयेत असे आव्हान ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हायटेक छावणी समजल्या जाणाऱ्या लासूर येथील चारा छावणीच्या भेटीवेळी केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अवघ्या आठ दिवसात ही चारा छावणी बंद पडली आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांवर मोठ संकट कोसळले आहे. लासूर येथील चारा छावणीत सहा हजारपेक्षा अधिक जनावरांना आमदार प्रशांत बंब आणि बजाज ऑटो, भारतीय जैन संघटनेच्या पुढाकाराने चारा-पाण्याची सोय करण्यात आली होती. मात्र आता ही छावणी अचानक बंद करण्यात आली आहे.
लासूर येथील चारा छावणीबाबत कोणतेही लेखी सूचना न देता संबधीत संस्थांनी चारा छावणी बंद केली आहेत. त्यामुळे, चारा छावणीसाठी नवीन संस्थांनी पुढाकार घेतल्यास त्यांना लगेच मंजुरी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे गंगापूर दुष्काळ समितीचे अध्यक्ष दत्तू कराळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितेले. तर दुसरीकडे, छावणीमध्ये जनावरांच्या संख्येत घट झाली होती. शेतकऱ्यांनी आपली जनावरे घरी घेऊन गेल्याने छावणी बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे, बजाज ऑटोचे सी.पी. त्रिपाठी म्हणाले.
शेतकरी म्हणतात..
मी बाभूळगाव येथील शेतकरी असून , माझे दहा जनावरे आहेत मात्र चारा छावणी चालकांनी घरी घेऊन जाण्याचे सांगितले. चारा विकत घेण्याची वेळ आली आहे. थोडेफार पैसे होते, मात्र ते बियाणे घेण्यासाठी लागणार आहे.त्यामुळे आठ दिवस पुरेल एवढा चारा शिल्लक आहे. असे लक्ष्मण सोनवणे म्हणाले.