राणीच्या बागेत प्राणी परतणार!
By admin | Published: September 23, 2014 05:29 AM2014-09-23T05:29:40+5:302014-09-23T05:29:40+5:30
गेली कित्येक वर्षे राणीबागेच्या नूतनीकरणाचा प्रकल्प सुरू आहे. त्यामुळे या उद्यानात प्राणी-पक्षी दिसणे तसे दुर्मीळच झाले आहे.
स्नेहा मोरे, मुंबई
गेली कित्येक वर्षे राणीबागेच्या नूतनीकरणाचा प्रकल्प सुरू आहे. त्यामुळे या उद्यानात प्राणी-पक्षी दिसणे तसे दुर्मीळच झाले आहे. त्यामुळे उद्यानाला भेट देणारी बच्चेकंपनी काहीशी हिरमुसली दिसून येते. आता मात्र बच्चेकंपनीसाठी खूशखबर आहे, राणीच्या बागेत लवकरच प्राणी-पक्षी टॅक्सीडर्मीच्या रूपात परतणार असून या वन्यजीवांना खूप जवळून पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.
वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत ‘सेंट्रल झू आॅथॉरिटी’ने २००८ साली देशातील सर्व प्राणिसंग्रहालयांमध्ये ‘उद्बोधन केंद्र’ उभारण्याचा निर्णय घेतला. प्राणिसंग्रहालयामध्ये कोणतेही बदल करण्यापूर्वी सेंट्रल झू आॅथॉरिटीची परवानगी घ्यावी लागते. त्याअंतर्गत वीर जिजाबाई भोसले उद्यानातही उद्बोधन केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. या उद्यानाच्या नूतनीकरण प्रकल्पांतर्गत उद्बोधन केंद्राचेही काम अंतिम टप्प्यात आहे.
या केंद्रात लवकरच प्राणी-पक्षी
यांच्या टॅक्सीडर्मीची रवानगी करण्यात येईल.
भायखळा येथील वीर जिजाबाई भोसले उद्यानात मृत्यू झालेल्या काही प्राणी-पक्षी यांच्या टॅक्सीडर्मी तयार करण्याचा हा प्रकल्प होता. या प्रकल्पात मिलिटरी मकाऊ पोपट, बदक, हिमालयीन ब्लॅक बेअर, सफेद पोपट, वाघ, पिकॉक फिझन्ट, सुसर आणि तुरेधारी कबुतर यांचा समावेश आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीव जतन केंद्रात या टॅक्सीडर्मी तयार करण्यात आल्या आहेत. या केंद्राचे टॅक्सीडर्मिस्ट डॉ. संतोष गायकवाड यांनी वन्यजीवांना ‘चिरंजीवित्व’ प्राप्त करून देण्याचे हे काम केले आहे. या टॅक्सीडर्मीची आयुर्मर्यादा ८० ते ९० वर्षे असून त्या हवाबंद काचपेटीत जतन केल्या जातात.
स्तुत्य संकल्पना
प्राणिसंग्रहालयांमध्ये उद्बोधन केंद्र उभारण्याची संकल्पना अतिशय स्तुत्य असून त्या माध्यमातून पुढच्या पिढीला, तसेच संशोधक, विद्यार्थी, अभ्यासक, वैज्ञानिक अशा सर्व स्तरांतील व्यक्तींना त्याचा उपयोग होईल. शिवाय, बच्चेकंपनीसाठीही वन्यजीवांना इतक्या जवळून पाहणे हा अनुभव निराळा असेल, असे मत टॅक्सीडर्मिस्ट डॉ. संतोष गायकवाड यांनी व्यक्त केले.