‘टॅल्गो’ची वाट जनावरांनी अडवली
By admin | Published: August 14, 2016 02:20 AM2016-08-14T02:20:55+5:302016-08-14T02:20:55+5:30
दिल्ली येथून शुक्रवारी दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी मुंबईकडे निघालेल्या ‘टॅल्गो’ टे्रनच्या मार्गात रतलाम स्थानकाच्या हद्दीत रेल्वे रुळांवर गाईगुरांचा कळप आला. परिणामी या टे्रनला
मुंबई : दिल्ली येथून शुक्रवारी दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी मुंबईकडे निघालेल्या ‘टॅल्गो’ टे्रनच्या मार्गात रतलाम स्थानकाच्या हद्दीत रेल्वे रुळांवर गाईगुरांचा कळप आला. परिणामी या टे्रनला मुंबई सेंट्रल टर्मिनसला शनिवारी पहाटे निर्धारित वेळेत पोहोचण्यास विलंब झाला. मुंबई सेंट्रल येथे ही टे्रन १३ तास १७ मिनिटांनी दाखल झाली. या ट्रेनची आतापर्यंतची ही चौथी चाचणी होती. या चाचणीत टे्रनला ताशी १५० किमी वेगाने पळविण्याचे लक्ष्य होते.
चौथ्या चाचणीसाठी सज्ज टॅल्गो नवी दिल्ली येथून शुक्रवारी दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी मुंबईकडे रवाना झाली. या चाचणीत ‘टॅल्गो’ प्रतितास १५० किमी वेगाने चालविण्याचे लक्ष्य होते. मात्र रतलाम स्थानकाजवळ टे्रन दाखल झाल्यावर तिचा वेग मंदावला. गाईगुरांच्या कळपाने ‘टॅल्गो’ची वाट अडवल्याने निर्धारित वेळापत्रकानुसार तिची वेळ चुकली. रतलाम येथे टे्रनला थांबवण्यात आल्याने तिचा प्रवास २० ते २५ मिनिटे रखडला. येथून टे्रन जेव्हा२२२ मार्गस्थ झाली तेव्हा तिला प्रतितास १२० किमी वेगाने चालवण्यात आले. आणि मुंबई सेंट्रल टर्मिनसला ही गाडी शनिवारी पहाटे ४ वाजून ०७ मिनिटांनी दाखल झाली. दिल्ली ते मुंबई हे १ हजार ३८४ किमीचे अंतर चौथ्या चाचणीत टॅल्गोने १३ तास १७ मिनिटांत पुर्ण केले. या संपूर्ण प्रवासात ट्रेनचा सरासरी वेग हा ताशी १०२ किमी होता. आता ‘टॅल्गो’ची पुढील चाचणी १४ आॅगस्ट रोजी होणार आहे. ट्रेनला ताशी १३० किमी वेगाने चालवले जाईल. (प्रतिनिधी)