अंधांच्या विश्वचषकमध्ये चमकला देउळघाटचा अनीस
By admin | Published: February 13, 2017 10:34 PM2017-02-13T22:34:50+5:302017-02-13T22:39:50+5:30
ट्वेंटी-20 विश्वचषकविजेत्या भारतीय संघात बुलडाणा जिल्हयातील देउळघाट येथील दृष्टीबाधीत खेळाडू अनीस फखरुल्लाह मिर्झा
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 13 - भारताने अंधाच्या टी - २० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ९ गड्यांनी पराभव करीत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकाविले. या विजेत्या भारतीय संघात जिल्हयातील देउळघाट येथील दृष्टीबाधित खेळाडू अनीस फखरुल्लाह मिर्झा याचा समावेश आहे. अनीसने मिळविलेल्या यशामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
रविवारी बेंगलुरु येथे भारत-पाकिस्तान दरम्यान टी- २० क्रिकेट विश्वचषकासाठी अंतिम सामना खेळण्यात आला. या सामन्यात भारताने पाकिस्तानला नमवित विश्वचषक आपल्या नावे केले. या विश्वचषक सामन्यात खेळणाऱ्या ११ खेळाडूंमध्ये अनीस फखरुल्लाह बेग याने चमकदार कामगिरी करीत आपली गुणवत्ता सिद्ध केली. शेवटच्या सामन्यात १९८ चे लक्ष्य तीन खेळाडूंनीच पूर्ण केले. त्यामुळे अनीसला फलंदाजीची संधी मिळाली नाही. या स्पर्धेत भारतासह, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, नेपाल, बांग्लादेश, आॅस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज व इंग्लडच्या संघाचा समावेश होता. या स्पर्धेदरम्यान प्रत्येक संघाला नऊ सामने खेळण्याची संधी मिळाली. या ९ सामन्यातील आठ सामने भारतीय संघाने जिंकले.
लोकल रेल्वेत विकतो साहित्य
२८ वर्षीय अनीस बेगचे वडील फखरुल्लाह बेग हे व्यवसायाने ट्रकचालक आहेत. आर्थिक संकटामुळे वडीलांनी काही वर्षापूर्वी देउळघाट गाव सोडले व नाशिक येथे वास्तव्यास गेले. अनीसने कठीण परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. नोकरीच्या शोधात अनीस सध्या मुंबई परिसरातील अंबरनाथ येथे राहतो व रोजंदारी मिळविण्यासाठी तेथील लोकल रेल्वेमध्ये छोटे मोठे साहित्य विक्री
करण्याचे काम करतो आहे.