अंनिसचे आमदार, खासदारांविरोधात "जवाब दो" आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 07:49 PM2017-07-18T19:49:42+5:302017-07-18T19:57:19+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० आॅगस्टला ४ वर्षे पूर्ण होत असून अद्याप मारेकऱ्यांना शिक्षा झालेली नाही. याच प्रश्नाचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती...
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० आॅगस्टला ४ वर्षे पूर्ण होत असून अद्याप मारेकऱ्यांना शिक्षा झालेली नाही. याच प्रश्नाचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने २० जुलै ते २० आॅगस्टदरम्यान जवाब दो आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनात अंनिसचे शिष्टमंडळ प्रत्येक आमदार व खासदाराच्या घरी जाऊन यासंदर्भात जाब विचारणार आहे.
अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पाटील म्हणाले की, शीना बोरा हत्याकांडाचा तपास अवघ्या काही महिन्यांत लागतो. मात्र सामाजिक कार्यकर्ते दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा उलगडा होण्यास अद्याप विलंब होत आहे. एकंदरीतच सरकारमध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसत आहे. याउलट दोन्ही हत्यांमध्ये संशयित आणि आरोपी म्हणून सनातन संस्थेचे साधक समोर आले आहेत. तरीही या संस्थेविरोधात बंदीची कारवाई करण्यात सरकार टाळाटाळ करत आहे. त्यामुळे तत्काळ या हत्येचा तपास पूर्ण
करून संस्थेवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी लोकप्रतिनिधींनी विधानसभा, विधानपरिषद, राज्यसभा आणि लोकसभेत जाब विचारावा, म्हणून अंनिसचे शिष्टमंडळ प्रत्येक आमदार व खासदाराची भेट घेणार आहे. आतापर्यंत संबंधित लोकप्रतिनिधीने दाभोलकर व पानसरे हत्याकांडासंदर्भात काय पावले उचलली, यासंदर्भातील विचारणाही शिष्टमंडळ
करणार आहे. शिवाय आगामी काळात अधिक तीव्रतेने पाठपुरावा करून प्रकरणी मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार अंनिसने केला आहे.