"वाल्मीक कराडला घरीच एसी खोलीत ठेवा आणि सांगा की...", धनंजय मुंडेंचं नाव घेत दमानिया संतापल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 11:32 IST2025-02-28T11:31:53+5:302025-02-28T11:32:49+5:30
Walmik Karad News: वाल्मीक कराडला तुरुंगात दिल्या जात असलेल्या सुविधांबद्दल अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला.

"वाल्मीक कराडला घरीच एसी खोलीत ठेवा आणि सांगा की...", धनंजय मुंडेंचं नाव घेत दमानिया संतापल्या
बीडच्या कारागृहात असलेल्या वाल्मीक कराड याला व्हीआयपी वागणूक दिली जात असल्याचा आरोप मयत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केला आहे. वाल्मीक कराडला चहा-नाश्त्यापासून ते मोबाईल वापरण्याचीही सुविधा पुरवली जात असल्याचा आरोप करण्यात आला. यावरून अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंचं नाव घेत संताप व्यक्त केला. वाल्मीक कराड हा धनंजय मुंडेंचं सर्वस्व आहे. त्यामुळे हे होणारचं होतं, असं त्या म्हणाल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वाल्मीक कराडला कोणत्या वेळेला कोणता कर्मचारी चहा-नाश्ता नेऊन देतो. कोणत्या दिवशी वाल्मीक कराड व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे बोलतो, याबद्दल माहिती असून, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.
"तो धनंजय मुंडेंसारख्या मंत्र्याचा सारथी"
धनंजय देशमुख यांनी केलेल्या आरोपावर बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, "आपण समजून घ्यायला हवं की, तो एका मंत्र्याचा सारथी आहे. सारथीच नव्हे तर सर्वस्व आहे. त्यामुळे मंत्री पण धनंजय मुंडेंसारखा. त्यामुळे हे होणारच होतं. पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणत होतो की, त्या जेलमध्ये सीसीटीव्ही लावलाच पाहिजे. त्याचे व्हिडीओ शूट झालं पाहिजे", अशी मागणी अंजली दमानियांनी केली आहे.
घरीच ठेवा ना, तुरुंगात ठेवण्यात अर्थ नाही -अंजली दमानिया
"ज्ञानेश्वर डोईफोडे, ढाकणे हे पूर्णपणे बडदस्त जर तुरुंगात ठेवत असतील. त्यांना हवं नको, ते पुरवत असतील. चहा-नाश्ता, सगळच्या सगळं मिळत असेल, तर कठीण आहे ना. मग त्यांना तुरुंगात कशाला ठेवता, घरीच ठेवा ना. तुरुंगात ठेवण्यात काही अर्थच नाही. तुम्ही यापेक्षा त्यांना घरी एसी रुममध्ये बसू द्या आणि सांगा की, आम्ही त्यांना बंदिस्त केलं आहे", अशी टीका अंजली दमानिया यांनी राज्य सरकारवर केली.
"परत परत म्हटलं जात आहे की, त्याला गुन्हेगारासारखं वागवलं जात नाहीये. त्याच्या हातात बेड्या घातल्या जात नाहीत. आज पाच हजाराची चोरी केली, तरी तो माणूस तुरुंगात सडतो. पण, हे हायप्रोफाईल गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर राजकीय वरदहस्त आहे. त्यांची अशीच बडदास्त ठेवली जातेय. ढाकणे आणि डोईफोडे यांना पैसे दिले जातील", असा संताप अंजली दमानियांनी व्यक्त केला.
वाल्मीक कराडला मदत केल्याचा कोणावर आरोप?
कोणत्या दिवशी कोणत्या वेळी वाल्मीक कराड विशेष खोलीत जाऊन बसतो. तिथून तो व्हिडीओ कॉन्फरन्सिद्वारे बोलणं होतं, असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तुरुंगातील बक्सर मुलाणी, ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णा ढाकणे, सुधाकर मुंडे हे अधिकारी-कर्मचारी वाल्मीक कराडला सहकार्य करत आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.