अंजली दमानियांचा गौप्यस्फोट, धनंजय मुंडेंवर आरोप; "पंकजा मुंडेंविरोधातील फाईल्स घेऊन.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:53 IST2025-04-01T14:52:26+5:302025-04-01T14:53:12+5:30
मी बीड प्रकरण लावून धरले तेव्हा राजेंद्र घनवट यांचे नाव मी एका चॅनेलवर घेतले. तेव्हा काही शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क केला असं सांगत दमानिया यांनी शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा आरोप मुंडेंवर केला आहे.

अंजली दमानियांचा गौप्यस्फोट, धनंजय मुंडेंवर आरोप; "पंकजा मुंडेंविरोधातील फाईल्स घेऊन.."
मुंबई - ४-५ वर्षापूर्वी पंकजा मुंडे यांच्याविरोधातील काही फाईल्स घेऊन धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते. त्यांच्यासोबत तेजस ठक्कर नावाची व्यक्ती होती असं सांगत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गौप्यस्फोट केला आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय पोपट घनवट यांनी बीडमधील काही शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या यावरून दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी दमानियांनी हा गौप्यस्फोट केला.
अंजली दमानिया म्हणाल्या की, ४-५ वर्षापूर्वी धनंजय मुंडे स्वत: माझ्या घरी तेजस ठक्कर नावाच्या व्यक्तीसह आले होते. त्यांनी अख्खा फाईल्सचा बंच आणला होता. पंकजा मुंडेंविरोधातल्या या फाईल्स होत्या. त्या फाईल्सची माहिती दिली. त्याआधी मला तेजस ठक्कर, राजेंद्र घनवट यांचा फोन आला होता. जेव्हा धनंजय मुंडे माझ्याकडे फाईल्स घेऊन आले तेव्हा मी अशा दिलेल्या फाईल्सवर कधीही काम करत नाही हे समजावले. त्यामुळे मी पंकजा मुंडे यांचा कुठलाही विषय मी त्यावेळी लावून धरला नव्हता असं त्यांनी सांगितले.
तसेच मी बीड प्रकरण लावून धरले तेव्हा राजेंद्र घनवट यांचे नाव मी एका चॅनेलवर घेतले. तेव्हा काही शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क केला. माझ्या घरी आले तेव्हा राजेंद्र घनवट या व्यक्तीने शेतकऱ्यांचा छळ केल्याचं समोर आले. धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे राजेंद्र घनवट आहेत. या लोकांनी ११ शेतकऱ्यांना छळून त्यांच्या जमिनी लाटल्या. कोट्यवधीच्या जमिनी कवडीमोल भावात घेतल्या. शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. मृत शेतकऱ्यांना जिवंत दाखवून जमिनी लाटल्या. जे शेतकरी विरोधात गेले त्यांच्याविरोधात खूनाचे, मानहाणीचे गुन्हे दाखल केले. त्यात एक पीएसआयदेखील आहे असा आरोप अंजली दमानिया यांनी केला.
दरम्यान, धनंजय मुंडे आणि घनवट यांचा काय संबंध आहे, त्यांचे आर्थिक संबंध कसे आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे. २००४ पासून शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या गेल्या. बनावट कागदपत्रे बनवण्यात आली आहे. याविरोधात यंत्रणा बोलत नाही. राजकारण्यांच्या पाठबळाने शेतकऱ्यांची फसवणूक झाली. बीडमधील शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या गेल्यात त्याची चौकशी करावी अशी मागणी अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.