अंजली तेंडुलकरांचे दस्तऐवज महावितरणकडून गहाळ? वीजजोडणीसाठी सादर केलेली कागदपत्रे सापडेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 01:24 AM2017-11-16T01:24:28+5:302017-11-16T01:25:00+5:30
विरारमधील एका गृहसंकुलात अंजली सचिन तेंडूलकर यांच्या नावाने दोन सदनिका असून त्यासाठी महावितरणने वीज जोडणी दिली आहे.
शशी करपे
वसई : विरारमधील एका गृहसंकुलात अंजली सचिन तेंडूलकर यांच्या नावाने दोन सदनिका असून त्यासाठी महावितरणने वीज जोडणी दिली आहे. मात्र, वीज जोडणीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रेच महावितरणच्या कार्यालयातून गहाळ झाली आहेत कागदपत्रे सादर न करताच परस्पर वीज जोडणी देऊन तेंडुलकर यांची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
येथील काही गृहसंकुलाला दुसºया सब स्टेशनमधून फक्त लिफ्ट आणि वॉटर पंपसाठी वीज जोडणी मंजूर करण्यात आली आहे, असे असतांना महावितरणच्या अधिकाºयांनी बिल्डरांच्या फायद्यासाठी सब स्टेशन न बांधताच दुसºयाच सब स्टेशनमधून १ हजार २८ वीज मीटर दिल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक धनंजय गावडे यांनी उजेडात आणली आहे. याप्रकरणात ते खोलात गेले असता विख्यात क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची पत्नी अंजली तेंडुलकर यांच्या नावाने विरारमधील एका गृहसंकुलात दोन सदनिका आहेत. वीज जोडणी दिलेल्यांमध्ये त्यांचाही समावेश आहे. यासंबंधी त्यांनी माहितीच्या अधिकारात माहीत मागवली असता महावितरणचा आणखी एक घोळ चव्हाट्यावर आला आहे.
महावितरणची जोडणी घेताना वीज मागणी अर्जासोबत टेस्ट रिपोर्ट, फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड, सदनिका नोंदणी दस्तऐवजच्या प्रती देणे बंधनकारक आहे. अंजली तेंडुलकर यांच्या नावे वीज जोडणी देतांना सादर केलेल्या दस्ताऐवजांच्या प्रती मागितल्या असता महावितरणने फक्त अर्ज आणि टेस्ट रिर्पोर्टच्या प्रती दिल्या. इतर कागदपत्रे असिस्टंट इंजिनियर उमेश कदम शोधत असून ती सापडल्यानंतर उपलब्ध करून दिली जातील, असे लेखी उत्तर महावितरणच्या ज्युनियर इंजिनियर तथा जनमाहिती अधिकारी योजना माने यांनी गावडे यांना दिले आहे.
अंजली तेंडुलकर यांच्या सदनिकांना ३ मे रोजी मीटर लावण्यात आले आहे असे असताना अवघ्या सहा महिन्यात इतक्या महत्वाच्या व्यक्तीची कागदपत्रे महावितरणच्या कार्यालयात सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सदनिका तेंडुलकर यांच्या असतील तर त्यांची योग्य ती कागदपत्रे का घेतली नाहीत? सचिन तेंडुलकर यांची ख्याती आणि स्थान लक्षात घेता अशा पद्धतीने बेकायदेशीर जोडणी देणे चुकीचे आहे
- धनंजय गावडे, नगरसेवक
पुरेशी कागदपत्रे घेतल्यानंतरच वीज जोडणी दिली जाते. ती स्थानिक पातळीवरून दिली जात असल्याने त्याची या कार्यालयात सविस्तर माहिती नसते. याप्रकरणाची माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल.
- अरुण पापडकर, अधिक्षक अभियंता