अन् अंकित स्वत:च निघाला अनंताच्या प्रवासाला...
By admin | Published: January 6, 2015 01:07 AM2015-01-06T01:07:14+5:302015-01-06T01:07:14+5:30
ज्या आई-वडिलांनी आपल्याला लहानाचे मोठे केले, शिकविले, कमावते केले, त्यांना त्यांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त परदेशवारीची गोड भेट द्यावी यासाठी अंकितची जोरदार तयारी सुरू होती़
नियती निष्ठूर : गांधी कुटुंबावर आभाळ कोसळले
नागपूर : ज्या आई-वडिलांनी आपल्याला लहानाचे मोठे केले, शिकविले, कमावते केले, त्यांना त्यांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त परदेशवारीची गोड भेट द्यावी यासाठी अंकितची जोरदार तयारी सुरू होती़ परंतु तिकडे काळाच्या मनात मात्र वेगळेच काही शिजत होते़ काळाच्या डावापासून अनभिज्ञ असलेला अंकित स्कूटरने निघाला होता. अखेर नियतीने डाव साधला अन् आई-वडिलांना परदेशवारी घडवण्याआधीच अंकितला अनंताच्या प्रवासाला निघावे लागले.
रायबंदर-पणजी या जुन्या महार्गावर फियाट कार व दोन डिओ स्कूटर यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात नागपुरातील अंकित हेमंत गांधी (२४) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शांत स्वभावाच्या एकुलत्या एक अंकितचे अचानक निघून जाण्याने कुटुंबीयांसोबतच त्याच्या मित्रपरिवारामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अंकित हा नागविदर्भ चेम्बर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष हेमंत गांधी यांचा मुलगा आहे. मा.बा. गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिवंगत मनोहर गांधी यांचा तो नातू आहे.
विधीचे शिक्षण घेतलेल्या अंकितला नुकतीच गोव्यातील एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली होती. नववर्षाच्या दिनी त्याचा वाढदिवस होता. यातच तो घरापासून दूर असल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. लवकरच तो एका जवळच्या नातेवाईकाच्या लग्नासाठी नागपूरला येणार होता. त्यासाठी त्याने तयारीही केली होती. अंकित नागपूरला येणार म्हणून आई-वडील आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्यासाठी मुलगी पाहण्याचे ठरवले होते.
इकडे अंकितनेही पुढील महिन्यात होऊ घातलेल्या आई-वडिलांच्या २५ व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नियोजन केले होते. आई-वडिलांनी हाँगकाँग फिरून यावे, यासाठी तो आग्रही होता. सर्वांनाच त्याच्या येण्याची वाट होती. अंकितने नागपूरला येण्यासाठी तिकीटही काढून घेतले होते. परंतु रविवारी अचानक काळाने घाला घातला आणि अंकित सर्वांपासून दूर गेला. (प्रतिनिधी)
हृदय पिळवटून टाकणारे हुंदके
सोमवारी रात्री अंकितचे पार्थिव विमानाने नागपुरात आणण्यात आल्यानंतर, अंत्यदर्शनासाठी ते काही वेळ धंतोली येथील ‘१५ आॅगस्ट’ या निवासस्थानी ठेवण्यात आले. यावेळी उपस्थितांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. अतिशय समंजस आणि सर्वांना मदत करणारा अंकित असा अचानक निघून गेला, या विदारक सत्यावर कुणीच विश्वास ठेवायला तयार नव्हते. नियती एवढी निष्ठूर असू शकते का? हा एकच प्रश्न या हुंदक्यातून येत होता. उशिरा रात्री स्थानिक मोक्षधाम येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.