अण्णा आणि (प)वार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 02:23 PM2019-09-28T14:23:37+5:302019-09-28T14:32:33+5:30
ठाकरेंनी ‘वाकड्या तोंडाचा गांधी’ असे अण्णांना हिणवले होते.
- सुधीर लंके
राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अण्णा हजारे यांनी शरद पवारांना ‘क्लिन चीट’ दिली ही सर्व माध्यमांत मोठी बातमी बनली. पण, अण्णा हे पवारांचे स्तुतीपाठक अथवा समर्थक बनले असे यातून म्हणता येत नाही. अण्णांचे ते विधान हे तांत्रिक होते. अण्णा आणि पवार यांच्यात विळा भोपळ्याचे वैर सातत्याने दिसले. त्यामुळे हे दोघेही एकमेकाचे चाहते बनूच शकत नाहीत.
अण्णांच्या आंदोलनाच्या सुरुवातीच्या काळातच त्यांचा सामना शरद पवारांशी झाला होता. १९९० च्या सुरुवातीला सामाजिक वनीकरण व पाणी पुरवठा योजनांची भ्रष्टाचाराची प्रकरणे अण्णांनी बाहेर काढली होती. त्यावेळी पवार मुख्यमंत्री होते. वनीकरण खातेही त्यांच्याकडेच होते. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कारवाई होत नाही म्हणून अण्णांनी त्यावेळी ‘वृक्षमित्र’ पुरस्कार थैलीत बंद करुन सरकारकडे पाठविला. त्याकाळात अण्णा व पवार या दोघांमध्येही अनेक शाब्दिक चकमकी उडाल्या. ‘अण्णा हजारे यांना समाजसेवेचा दर्प चढला आहे’ अशी टीका पवारांनी केली होती. त्यावर ‘भ्रष्टाचारी प्रवृत्तीला पाठिशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाच सत्तेचा मद चढला आहे,’ असे प्रत्युत्तर अण्णांनी दिले. ‘ज्यांना आपण जाणता राजा म्हणतो तो तर नेणता राजा निघाला’ ही अण्णांची प्रतिक्रिया त्यावेळी राज्यभर गाजली.
वृक्षमित्र पुरस्कार परत करुन व आंदोलने करुनही मार्ग निघत नसल्याने अण्णांनी १९९४ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. त्या चर्चेवर निवेदन करताना पवारांनी मोठे मजेशीर निवेदन केले होते. ते म्हणाले, ‘अण्णा पद्मश्री परत करणार असल्याबद्दल माहिती नव्हती. अन्यथा आपण त्यांना पुरस्कार परत करुन दिला नसता’. पवारांचा हा अण्णांना बेदखल करण्याचाच प्रयत्न होता.
पुढे १९९५ ला युतीचे सरकार आले. अण्णांच्या आंदोलनाचा युतीला सत्तेवर येण्यासाठी फायदा झाला हे पवारांच्या डोक्यात पक्के बसलेले आहे. पुढे अण्णांनी युतीच्या मंत्र्यांविरोधातही आंदोलने केली. युती जाऊन पुन्हा आघाडी सरकार आल्यावर त्यांच्याही मंत्र्यांचे राजीनामे घेतले. केंद्रात मनमोहन सिंग सरकारच्या काळात अण्णा ‘लोकपाल’साठी त्या सरकारविरोधातही लढले. त्या आंदोलनानंतर मोदी पंतप्रधान झाले. एक सरकार जाऊन दुसरे आले हे अण्णांच्या आंदोलनानंतर अनेकदा घडले. त्यामुळे अण्णांचे तसे कुणीच चाहते नाही. अण्णांचा पवारांशी जसा संघर्ष झाला. तसा तो बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही झाला. ठाकरेंनी ‘वाकड्या तोंडाचा गांधी’ असे अण्णांना हिणवले होते. आता मोदींवरही अण्णा टीका करत आहेत.
मध्यंतरी शरद पवार यांच्यावर दिल्लीत हल्ला झाला त्यावेळी ‘एकही थप्पड मारा क्या’ असे म्हणत अण्णांनीही वादग्रस्त विधान केले होते. त्यात त्यांचा पवारांवरील राग दिसून आला. मनमोहनसिंग हे लोकपाल कायद्याच्या मसुदा समितीवर पवारांना घेऊ इच्छित होते. पण, अण्णांनी विरोध केल्याने पवार स्वत:च या समितीपासून बाजूला झाले. अलीकडच्या काळात पवार व अण्णा हे दोघेही एकमेकाबद्दल जाहीरपणे काही बोललेले नाहीत. मध्यंतरी राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी ‘अण्णा हे संघाचे एजंट आहेत’ अशी टीका केली होती. राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते अण्णांवर टीका करतात. पण, स्वत: पवार हे आता अण्णांना छेडत नाहीत. ते मौन बाळगणे पसंत करतात. अण्णांची दखल घ्यायची नाही अशी नीती पवारांनी ब-याचदा अवलंबलेली आहे. शुक्रवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी राहुल गांधींपासून सर्वांचे आभार मानले. अगदी शिवसेनेचे सुद्धा. पण, अण्णांचा उल्लेख केला नाही. स्वत: पवार हे आजवर कधीही राळेगणसिद्धीत आलेले नाहीत.
राज्य सहकारी बँकेतील कर्जवाटबाबत अण्णांनीही तक्रार केली आहे. त्यांचीही याचिका आहे. कॅग, नाबार्ड या अहवालांत शरद पवारांचे नाव नाही. मात्र, त्यात अजित पवारांसह इतरांची नावे आहेत, असे अण्णा राळेगणसिद्धीत म्हणाले. अण्णांकडे जी कागदपत्रे आहेत त्यात शरद पवारांवर ठपका असल्याचा कोठेही उल्लेख नाही, त्या अर्थाने अण्णांनी हे स्पष्टीकरण केले आहे. अण्णांचा हा खुलासा तसा तांत्रिक आहे. यावरुन ते लगेच पवारांचे चाहते झाले किंवा पवारही लगेच अण्णांचे समर्थक बनतील असा श्लेष निघत नाही.
अण्णांनी आजवर सुधाकरराव नाईक, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख यांची मुख्यमंत्री म्हणून स्तुती केली. ‘नरेंद्रपेक्षा देवेंद्रचे काम उठून दिसते’ अशी तारीफ त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचीही केली आहे. मात्र, पवारांबद्दल अण्णा स्तुतीदर्शक बोलले अशी उदाहरणे नाहीत. पवारही हे जाणून आहेत. अण्णा आणि पवार यांच्यात एक सुप्त ‘वॉर’ सतत दिसत आले.