व्यवसाय शिक्षण संचालक नियुक्तीचा वाद अण्णांकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 04:28 AM2019-01-31T04:28:34+5:302019-01-31T04:29:00+5:30
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील गैरप्रकारांची चौकशी सुरू असतानाही अनिल जाधव यांच्याकडे प्रभारी संचालकपदाचा कार्यभार दिल्याने कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी निलंगेकर अडचणीत सापडले आहेत.
- विनोद गोळे
पारनेर (जि.अहमदनगर) : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील गैरप्रकारांची चौकशी सुरू असतानाही अनिल जाधव यांच्याकडे प्रभारी संचालकपदाचा कार्यभार दिल्याने कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी निलंगेकर अडचणीत सापडले आहेत. जाधव यांच्याशी संबंधित फाईलच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दरबारी आल्याची माहिती आहे.
राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात सन २०१३-१४ मध्ये लेथ मशिन, विविध यंत्रसामग्री खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाला. त्यावेळी अनिल जाधव हे शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक होते़ या गैरव्यवहार-प्रकरणी उद्योग विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या चौकशीत दोषी ठरल्याने त्यांचा कार्यभार ३१ मार्च २०१८ रोजी काढून घेतला. याबाबत विधानसभेत काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता़ निलंगेकर यांनी प्रभारी संचालक अनिल जाधव यांचा पदभार काढून घेतल्याचे सांगितले. त्यांचा पदभार या विभागाचे आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे दिला होता. रवींद्रन यांची बदली झाल्यानंतर संचालकपदाचा पदभार पुन्हा जाधव यांच्याकडे दिला आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालकपदाचा प्रभारी कार्यभार अनिल जाधव यांच्याकडे दिल्याबाबत आपणास सचिवांकडेच विचारणा करावी लागेल़ त्यांच्याकडेच याचे अधिकार आहेत़ या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असल्याने मी याबाबत काहीच बोलू शकत नाही.
- संभाजी निलंगेकर, मंत्री कौशल्य विकास व उद्योजकता विभाग