अण्णा हजारेंचा मोदींना शेवटचा इशारा; उत्तर द्या, अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 08:46 AM2018-03-13T08:46:12+5:302018-03-13T09:40:58+5:30
आंदोलनाच्या जागेसाठी ७ नोव्हेंबर २०१७ पासून हजारे यांनी आतापर्यंत बारा वेळा पत्रे मोदींना पाठवली आहेत.
नगर: लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर करण्यात येणाऱ्या आंदोलनासाठी वारंवार विनंती करूनही जागा उपलब्ध न करून दिल्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदींना शेवटचा इशारा दिला आहे. मला आंदोलनासाठी दिल्लीत जागा न उपलब्ध करून दिल्यास नाईलाजाने तुरुंगात आंदोलन करावे लागेल, असे अण्णांनी म्हटले आहे. अण्णा हजारे येत्या 23 मार्चपासून आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. आंदोलनाच्या जागेसाठी ७ नोव्हेंबर २०१७ पासून हजारे यांनी आतापर्यंत बारा वेळा पत्रे मोदींना पाठवली आहेत. मात्र, यापैकी एकाही पत्राला उत्तर देण्याचे सौजन्य पंतप्रधान मोदींनी दाखविलेले नाही. त्यामुळे अण्णांनी पंतप्रधान मोदींना अखेरचे पत्र पाठवून अंतिम इशारा दिला आहे.
तत्पूर्वी राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थांनी उपोषण न करण्यासाठी अण्णांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी परिवारासह देशाला गरज आहे. त्यामुळे, अण्णांनी वाढते वय व विविध व्याधींचा विचार करता नवी दिल्ली येथे उपोषण न करता काही तरी वेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करावे, असे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, उपोषणाने मी मरणार नाही अन् सरकारमध्ये मला मरू देण्याची हिंमत नाही, असे सांगत अण्णा हजारे यांनी नवी दिल्ली येथे २३ मार्चपासून उपोषण आंदोलन करण्याचा निर्धार कायम ठेवला होता. अण्णा हजारे यांनी आतापर्यंत लोकपाल तसेच जनतेच्या हिताच्या विविध मुद्यांवर ४३ पत्रे पंतप्रधानांना पाठवली आहेत. मात्र, यापैकी एकाही पत्राला नरेंद्र मोदी यांच्याकडून उत्तर देण्यात आलेले नाही.