गैरव्यवहारांच्या आरोपातून अण्णा हजारे दोषमुक्त
By admin | Published: July 27, 2015 12:54 AM2015-07-27T00:54:52+5:302015-07-27T00:54:52+5:30
राळेगणसिद्धी येथील भ्रष्टाचार जनआंदोलन न्यासासह ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व विश्वस्तांविरुद्ध केलेला दावा सिद्ध करू शकणारे पुरावेच सादर
पुणे : राळेगणसिद्धी येथील भ्रष्टाचार जनआंदोलन न्यासासह ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व विश्वस्तांविरुद्ध केलेला दावा सिद्ध करू शकणारे पुरावेच सादर न झाल्याने सहधर्मादाय आयुक्तांच्या न्यायालयाने या सर्वांची निर्दोष मुक्तता केली.
अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासामध्ये गैरव्यवहार असून, त्याचे हिशोब वेळेवर दाखल केले जात नाहीत, असा आरोप शरद सोनु वाणी (६५, रा. जळगाव) यांनी केला होता.
सर्व गैरव्यवहारांची चौकशी करून न्यासाच्या अध्यक्ष तसेच विश्वस्त पदावरून अण्णांना काढून टाकून संस्थेवर कारवाई करण्यासाठी वाणी यांनी २३ डिसेंबर २०१४ रोजी सहधर्मादाय आयुक्तांच्या न्यायालयात दावा दाखल केला होता. वाणी यांना पुरावे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र वारंवार संधी देऊनही कोणतेही पुरावे वाणी न्यायालयासमोर सादर करू शकले नाहीत. वाणी व त्यांच्या सहकाऱ्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे अण्णा हजारेंनी बाहेर काढली होती. त्यामुळेच त्रास देण्यासाठी व बदनामी करण्यासाठी खोटे आरोप असलेला दावा लावला. हे सर्व आरोप खोटे असून, संस्थेचे हिशोब व बाकी यासह सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता वेळेत करण्यात आल्याचा अॅड. पवार यांचा युक्तीवाद ग्राह्य धरीत तसेच वाणी पुरावे सादर न करू शकल्यामुळे सहधर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी अण्णा हजारे व त्यांच्या संस्थेला दोषमुक्त केले.