नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीसांचं काम लक्षवेधी; अण्णा हजारेंकडून तोंड भरून स्तुती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 07:27 PM2019-09-11T19:27:16+5:302019-09-11T19:29:06+5:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी फडणवीस सरकारवर स्तुतिसुमनं उधळली आहेत.
अहमदनगरः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी फडणवीस सरकारवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजपा सरकार भ्रष्टाचारमुक्त असल्याचं म्हटलं आहे. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस दोघे निष्कलंक असून, त्यांच्यावर कोणत्याही भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात घोटाळ्यांची कोणतीही प्रकरणं माझ्याकडे पाच वर्षांत आलेली नाही. तसेच नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीसांचं काम लक्षवेधी असल्याचं अण्णा हजारे म्हणाले आहेत.
मुख्यमंत्र्यांना फोन केल्यावर ते मला प्रतिसाद देतात, तसंच माझं ऐकतातही. केंद्रानं लोकपाल कायदा आणला असून, राज्यांनीही लोकायुक्त नियुक्त करण्याची कारवाई सुरू केलेली आहे. माझ्याकडे केंद्र आणि राज्य सरकारविरोधात कोणतेही पुरावे नसल्यानं मी कोणाविरोधात आणि कशासाठी आंदोलन करू, असंही अण्णा हजारेंनी विचारलं आहे.
तर दुसरीकडे शरद पवारांवरही त्यांनी टीका केली आहे. शरद पवारांची काम करण्याची पद्धत पाहूनच राष्ट्रवादीतून अनेक नेते सोडून जात आहेत. साखर कारखाने आणि बँका लुटून खाल्ल्याचा हा परिणाम असून, जसं करावं तसंच भरावं लागतं, असं अण्णा हजारे म्हणाले आहेत. सत्ता सांभाळण्यासाठी काही भ्रष्ट लोक भाजपा घेत आहे. जनतेनं त्या भ्रष्ट लोकांचा निकाल लावाला, असं म्हणत अण्णा हजारेंनी भाजपावर निशाणा साधला आहे.